नाशिकच्या 72 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:27 PM2020-01-09T19:27:11+5:302020-01-09T19:33:38+5:30
दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे.
नाशिक : करिअरमधील महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या वर्गाकडे पाहिले जाते. अशा दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण ११०८ शाळांपैकी सुमारे १०३२ शाळांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, ८९ हजार ३२६ विद्यार्थ्यांपैकी ७२ हजार ७९२५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत परीक्षा दिली आहे. अजूनही अनेक काही शाळांनी विद्यार्थ्यांची चाचणी घेतलेली नाही, अशा शाळांनी तत्काळ कलमापन व अभिक्षमता चाचणी पूर्ण करण्याच्या सूचना नाशिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्हातील शाळांना केल्या आहेत.
जिल्हाभरातील विविध शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची २९ डिसेंबर २०१९ पासून कलमापन व अभिक्षमता चाचणीला सुरुवात झाली असून, महाकरिअर मित्र अॅपद्वारे आॅनलाइन घेतली जाणारी ही चाचणी १८ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. कलचाचणी मोबाइल अॅपद्वारे घेण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी ‘महाकरिअर मित्र’ अॅप सुरू करण्यात आले असून, चाचणी परीक्षेसाठी गुगल प्लेस्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइल अॅपद्वारे कलचाचणी देता येणार नाही, त्यांना संगणकाच्या मदतीनेही कलचाचणी देता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून, या परीक्षांच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी कलचाचणीची मदत होते. यात कलचाचणीद्वारे कृषी, कला व मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आदी क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा असलेला कल जाणून घेतला जातो, तर अभिक्षमता चाचणीद्वारे भाषिक, तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय अशा चार क्षमतांची चाचणी घेण्यात येणार असल्याचे विभाग समन्वयक डॉ. बाबासाहेब बडे यांनी सांगितले.