८०पेक्षा जास्त अॅप वापरता येतील एकाच ‘डीग मी अप’मधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 04:24 PM2019-07-10T16:24:08+5:302019-07-10T16:24:37+5:30
या ॲपची मेमरी स्पेस इतकी आहे की वापरकर्त्यांना वेगळी सोशल नेटवर्किंग ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. अधिकाधिक सोशल नेटवर्किंग ॲप्स डिगमीअपच्या अंतर्गतच ऑपरेट करता येतील, एवढी यात स्पेस आहे. तसंच फोटो आणि व्हिडिओ अशा गोष्टींसाठीही यामध्ये भरपूर स्पेस असेल.
नाशिक : सॉफ्टवेअर अभियंता होऊन जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी परतणाऱ्या नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी लाटे या दाम्पत्याने सोशल नेटवर्किंगमध्ये पाऊल टाकत आपल्या ज्ञान व कौशल्याच्या जोरावर माहितीतंत्रज्ञानात एक नाविन्यपुर्ण शोध लावला आहे. ८०पेक्षा अधिक ग्राहक फ्रेन्डली अॅप्लिकेशनला एकाच ‘डीग मी अप’ नावाच्या अॅप्लिकेशनमध्ये साठविण्याचा नवा पर्याय त्यांनी शोधून काढला आहे. हे अन्ड्रॉइड अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.‘डीग मी अप’ या नव्या अॅप्लिकेशनच्या नावाचा अर्थ ‘मला शोधून काढा’ असा होतो. या अॅप्लिकेशनमध्ये एकापेक्षा अधिक अॅप्लिकेशन नेटवर्क जोडून सर्वच सोशल साइट्स वापरता येऊ शकतात, असा दावा सोहम व देवयानी यांनी केला आहे.स्मार्ट फोनच्या दुनियेत विविध प्रकारचे अॅप्लिकेशन उपलब्ध झाले असून अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशन स्मार्ट फोनमध्ये डाउनलोड करताना साठवणूक क्षमतेचा विचार करावा लागतो. त्यामुळे या युवा जोडीने त्याच्यावर तोडगा काढत ‘डीग मी अप’ नावाचे एक स्वतंत्र अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशन विकसित केले आहे. या अॅप्लिकेशनमध्ये ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, जी मेल, इन्स्टाग्राम यांसारखे आपल्याला हवे असलेले सुमारे ८०हून अधिक अॅप्लिकेशन सहजरीत्या जोडून ते वापरता येणे शक्य असल्याचा ते म्हणाले.
हे अॅप्लिकेशन प्ले-स्टोअरवरून अगदी मोफत डाउनलोड करता येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या नवीन माहिती तंत्रज्ञानातील शोधाबाबत ‘डीग मी अप’ नावाने आंतरराष्टÑीय पेटंट मिळविण्यासाठी अर्जही केल्याचे सोहमने सांगितले. साधारणत: २०एमबीचे हे अॅप नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.