भविष्यात नाशिकमध्ये अजून धरणे उभारावी लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:54+5:302021-05-25T04:14:54+5:30
नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, ...
नाशिक : पाण्याच्या बाबतीत नाशिक आपत्कालीन उंबरठ्यावर उभे आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आणखी धरणे उभारावी लागतील, अशी जाणीव के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी करून दिली.
वसंत व्याख्यानमालेत ‘नाशिकचे पाणी’ या विषयावर ते बोलत होते. स्व. शांतारामबापू वावरे स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. कुटे यांनी चोविसावे पुष्प गुंफले. यादरम्यान त्यांनी ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत होणाऱ्या नाशिकच्या पाण्याच्या प्रवासातील स्थित्यंतरे प्रकर्षाने मांडली. देशात सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३५४ धरणे महाराष्ट्रात असूनही सिंचन क्षमता फक्त सोळा टक्के आहे. ही लाजिरवाणी बाब असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले. केवळ धरणे बांधून चालणार नाही, तर सिंचन क्षमता वाढेल याचाही विचार होणे आवश्यक आहे. राज्यात शहरीकरणाचा वेग असलेले नाशिक हे पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. शहरीकरण होते तेव्हा जलस्रोत कमी होतात. १८८१ साली नाशिकमध्ये ९५ हजार लोकसंख्या असताना २१४ विहिरी, ३७ तलाव, १३२ जलस्रोत होते. विशेष म्हणजे नाशिकची जीवनदायिनी म्हणून नंदिनी नदी म्हणजेच आजच्या नासरडी नदीला स्थान होते. गोदावरी नदी फक्त कर्मकांड करण्यापुरती होती. आज त्याच नंदिनी नदीचा नाला बनल्याची खंत डॉ. सुनील कुटे यांनी व्यक्त केली.
आजमितीला नाशिक शहराची लोकसंख्या २० लाख असून, पावसाचे प्रमाण ७० मिलिमीटर आहे. स्मार्टसिटी उदयास येत असताना पाण्याचे व्यवस्थापन स्मार्ट झाले पाहिजे. जगातील पहिले मातीचे धरण गंगापूर असून, या धरणामुळे नाशिकचा विकास वेगाने झाला. पिण्याचे पाणी, याबरोबरच औद्योगिक वसाहती, शेतीलाही धरणातून पाणीपुरवठा होतो. गौतमी, गोदावरी आणि काश्यपी धरणावर नाशिकची तहान भागविली जात आहे. थेट पाइपलाइन योजनेतून पुरवठा होताना पाण्याचा मोठा अपव्यय होताना दिसत आहे. चाळीस हजार नळांद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो; पण अर्धेअधिक नळ विनातोटीचे असल्याने पाणी वाया जाते. प्रति माणशी पाणी देताना मानके पाळली जात नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातून ३५ टक्के अतिरिक्त पाणी दिले जाते, याकडे डॉ. कुटे यांनी लक्ष वेधले.
भविष्यकाळात २५ लाख लोकसंख्या गृहित धरून पाण्याचे नियोजन व्हायला हवे. कमी पाऊस, पाणीचोरी यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन होण्याची गरज आहे. गोदावरीचे आरोग्य बिकट असून, वाळू चोरीमुळे नदीची घुसमट होत आहे. सांडपाणी सर्रास नदीत सोडल्याने प्रदूषण ही समस्या भेडसावतेय. जलशुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेत जलशास्त्र विभागाची निर्मिती व्हावी, असे डॉ. कुटे यांनी सूचित केले. जिल्ह्यातील ज्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते ते पाणी अडवून धरणे उभारण्यात यावीत, अशी पुस्तीही डॉ. कुटे यांनी जोडली. माजी महापौर शांतारामबापू वावरे यांनी दूरदृष्टी ठेवून पाण्याचे नियोजन केल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळाल्याचे डॉ. कुटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.