कोरोनामुळे मृत्यूच्या तुलनेत मधुमेह, उच्चदाबाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:56+5:302021-05-06T04:14:56+5:30
गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय ...
गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याबरोबरच त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. आरोग्य खात्याने केलेल्या मृत्यूच्या लक्षणांच्या निरीक्षणात वयाची साठी पार केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के इतके उच्चांकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणत: चाळिशीनंतर प्रत्येक नागरिकाला कुठल्या ना कुठल्या शारीरिक व्याधी भेडसावत असतात. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, मेंदुविकार, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. अशा आजाराने त्रस्त रुग्ण अगोदरच आपली शारीरिक क्षमता गमावून बसलेला असल्याने त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यास ते गंभीर मानले जात आहे. नाशिक जिल्ह्यात १ एप्रिल रोजी २४०७ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. हेच प्रमाण संपूर्ण महिन्यात म्हणजेच ३० एप्रिल रोजी ३४९७ पर्यंत पोहोचले. याचाच अर्थ १०९० रुग्ण एका महिन्यात दगावले आहेत. आजवरच्या एकूण दगावलेल्या रुग्णांपैकी ११२७ रुग्ण हे कोमार्बिड म्हणजेच कोरोनाबरोबरच अतिगंभीर आजारांनी त्रस्त होते. त्याचे प्रमाण एक तृतीयांश इतके असल्याने ते रोखण्यासाठी आरोग्य खात्याने घरोघरी जाऊन अशा रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून, अशा रुग्णांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.
----------
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू- १०९०
२०७ इतर आजारांमुळे मृत्यू
८८३ कोरोनामुळे मृत्यू
--------------
अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?
मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार, मेंदुविकार, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी वेळच्या वेळी स्वत:च्या आरोग्याची तपासणी नियमित करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर औषधोपचारात हलगर्जीपणा करू नये, तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात न येता, स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. कोरोना काळात अतिगंभीर रुग्णांनी वेळोवेळी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणेही क्रमप्राप्त आहे.