कोरोना आल्याने निम्म्याहून अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:44+5:302021-01-08T04:41:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील ओपीडीमध्ये दरवर्षी येणाऱ्या नियमित रुग्णांच्या प्रमाणात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निम्म्याहून अधिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील ओपीडीमध्ये दरवर्षी येणाऱ्या नियमित रुग्णांच्या प्रमाणात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निम्म्याहून अधिक घट झाली आहे. प्रारंभीच्या दोन महिन्यांतील बाह्यरुग्ण संख्येचे प्रमाण मार्च महिन्यापासूनच घटण्यास प्रारंभ झाला असून, नोव्हेंबरपर्यंत ही रुग्णसंख्या निम्म्यापेक्षा अधिक घटली होती. वर्षअखेरीस त्यात थोडीशी वाढ झाली असली तरी अद्यापही ओपीडीचे प्रमाण निम्म्यावरच आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या चांगल्या सेवेच्या बळावर गत तीन वर्षांपासून सिव्हिलला सातत्याने राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यातूनच नाशिक जिल्हा रुग्णालयाचे कार्य चांगले असल्याचे सातत्याने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे वर्षातील प्रत्येक महिन्यात जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बाह्यरुग्णांची संख्यादेखील सरासरी ३५ हजारांवर असायचे. मात्र, मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास प्रारंभ झाल्याच्या वार्ता येऊ लागल्यानंतर बाह्यरुग्णांचे प्रमाण घटण्यास प्रारंभ झाला. हे प्रमाण मार्चपासूनच निम्म्यापेक्षा कमी झाले ते नोव्हेंबर अखेरपर्यंत तेवढेच होते. जे रुग्ण अत्यंत बिकट अवस्थेत आहेत, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये जाण्यासारखी आर्थिक परिस्थिती नसलेल्यांनी त्या काळातही जिल्हा रुग्णालयातील उपचारास प्राधान्य दिले. मात्र, डिसेंबर महिन्यापर्यंत जनतेच्या मनातील कोरोनाबाबतची दहशत कमी होण्यास प्रारंभ झाला. त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबरपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, तरीदेखील हे प्रमाण वर्षारंभाच्या तुलनेत निम्मेच असल्याने रुग्णसंख्या पूर्ववत होण्यास नवीन आर्थिक वर्षच उजाडण्याची शक्यता आहे.
इन्फो
आजाराच्या गांभीर्यापेक्षा कोरोनाची दहशत अधिक
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या विविध प्रकारच्या रोगी आणि आजारी रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कोरोनाने इतकी दहशत निर्माण केली हाेती की, एकवेळ आजार परवडला; पण कोरोनाची भर नको. त्यामुळेच बहुतांश आजारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय रुग्णालयामध्ये जाणे टाळत होते. काहींनी त्या आजारांवर घरगुती उपचार तर कुणी डॉक्टरांशी फोनवर बाेलून औषधे आणून उपचार केले. त्यामुळेच जिल्हा रुग्णालयच नव्हे तर सर्वच रुग्णालयांमधील ओपीडीची संख्या निम्म्याहून अधिक घटल्याचा अनुभव बहुतांश रुग्णालयांनी अनुभवला आहे.