निम्म्याहून अधिक कोरोनायोद्धे दुसऱ्या डोसपासून वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:35+5:302021-05-17T04:12:35+5:30
नाशिक : जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळेच पहिल्या डोसचा लाभ या दोन्ही ...
नाशिक : जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळेच पहिल्या डोसचा लाभ या दोन्ही श्रेणीत येणाऱ्या एक लाख २८ हजार ९११ कर्मचाऱ्यांना झाला होता. मात्र फेब्रुवारी, मार्चपासून दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप ५९,८२५ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात आला असून, उर्वरित सुमारे ६९ हजार फ्रंटलाइन वर्कर्स अद्यापही दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
कोरोनाकाळात ‘फ्रंटलाइन’ वर्कर म्हणून पोलिसांपासून विविध घटकांनी काम केले. त्या सर्व घटकांना प्रारंभीच्या टप्प्यात पहिला डोस देण्यात तत्परता दाखविण्यात आली. मात्र, दुसऱ्या डोसमध्ये तशा स्वरूपाची तत्परता किंवा प्राधान्यक्रम दिला गेला नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांना दुसऱ्या लसीसाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळे किमान काही प्रमाणात तरी त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण झालेले नसल्याने अनेक सदस्य बाधित होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांसह असे अन्य फ्रंटलाइन वर्कर्स घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पत्नी, लहान मुले, वृद्धांशी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने कोरोनाचा विषाणू त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत जात असल्याने अनेकांना संसर्ग होत असल्याचे पुढे आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र झटणार्या या फ्रंटलाइन वर्कर्सना एकीकडे कोरोनाशी तसेच दुसरीकडे कुटुंबातील कुणालाही ही लागण होऊ नये, यासाठी झटावे लागते. गत सव्वा वर्षांपासून सर्व फ्रंटलाइन वर्कर्स आणि कोरोनायोद्धे कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहे. पहिल्या लाटेत त्यातील अनेक कर्मचारी बाधित झाले. काहींचे निधन झाले तर काही बरे होऊन पुन्हा कार्यरत झाले. फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर या फ्रंटलाइन वर्कर्सना पुन्हा त्यांच्या कामात जुंपून घ्यावे लागले. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे निम्म्याहून अधिक कोरोना फ्रंटलाइन वर्कर्स दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले आहेत.
इन्फो
बँक कर्मचाऱ्यांनाही फ्रंटलाइन वर्कर्सचा मिळावा दर्जा
गतवर्षी मार्चपासून कोरोना विस्फोटाच्या काळात लॉकडाऊन केला असूनही ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामावर यावेच लागले, अशा सर्वच कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा किंवा फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा मिळण्याची गरज आहे. गतवर्षापासून बँक कर्मचाऱ्यांनादेखील जिवावरचा धोका पत्करून अज्ञात व्यक्तींच्या संपर्कात काम सुरूच ठेवावे लागले आहे. त्यामुळे या फ्रंटलाइन वर्कर्समध्ये बँक कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याची आवश्यकता असून, त्यांनादेखील लवकरात लवकर डोस मिळण्याची गरज असल्याचे बँकेच्या संघटनांचा दावा आहे.
--------------
ही डमी आहे.