अभियांत्रिकीच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:25 AM2018-08-29T01:25:53+5:302018-08-29T01:26:41+5:30
ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होत असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची मात्र विद्यार्थ्यांअभावी दैना उडाली आहे.
नाशिक : ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होत असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची मात्र विद्यार्थ्यांअभावी दैना उडाली आहे. प्रवेशक्षमतेच्या ३५ टक्के ही विद्यार्थी न मिळालेल्या महाविद्यालयांची राज्यातील आकडेवाडी फुगत चाललेली असताना नाशिक विभागात अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या १६ हजार ७८० पैकी ८ हजार ४२४ जागा म्हणजेच निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या अनेक तुकड्यांमध्ये अत्यल्प विद्यार्थ्यांनी प्र्रवेश घेतल्याची शक्यता असल्याने अशा शाखा पुढील चार वर्ष सुरू ठेवण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर निर्माण होणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) निकष पाळायचे तर एका अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता आजच्या घडीला ९० ते १०० कोटी रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक करावी लागते. त्यातून खर्चावर आधारित शुल्करचना असल्याने पूर्ण प्रवेश झाले तरच महाविद्यालय चालविणे संस्थाचालकांना परवडू शकते. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये क्षमतेच्या तुलनेत ३५ ते ५० टक्के जागा भरल्या आहेत. तर काही महाविद्यालयांना एवढ्या जागा भरण्यातही यश आलेले नाही. अशा परिस्थितीत नाशिक विभागात प्रथम वर्षाच्या १६ हजार ७८० पैकी केवळ ८ हजार २६६ प्रवेश झाले असून, ८ हजार ४२४ जागा म्हणजेच निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. तर अभियांत्रिकी पदवीनंतर थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या १३ हजार ९०७ जागांपैकी ७ हजार ८२३ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ६ हजार ८४ जागा रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी कुठे चार, कुठे आठ असे विद्यार्थी मिळाल्याने ही महाविद्यालये पुढची चार वर्षे चालणार तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला असतानाच्विद्यार्थ्यांच्या प्रवेशाअभावी विभागात विविध महाविद्यालयांमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या जवळपास दीडशे तुकड्या बंद करण्यात आल्या होत्या.
३१ आॅगस्टला ‘कट आॅफ’
४सध्या कोणत्या महाविद्यालयात किती प्रवेश झाले याची आकडेवारी समोर आलेली नाही. परंतु ३१ आॅगस्टला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी प्रवेशाचा क ट आॅफ जाहीर होणार असून, त्यानंतर विभागातील किती महाविद्यालयांमध्ये किती तुकड्या चालणार आणि कोणत्या महाविद्यालयांच्या किती वर्गखोल्यांना कुलूप लावावे लागणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.