रुचकर, पौष्टिक पदार्थांवर गृहिणींचा अधिक भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:09+5:302021-06-16T04:20:09+5:30
कच्च्या भाज्या, कडधान्ये, फळांचा ज्यूस अनेक स्वयंपाक घरात आता सकाळच्या चहाची जागा फळांचा ज्यूस किंवा हेल्दी काढ्याने घेतली आहे. ...
कच्च्या भाज्या, कडधान्ये, फळांचा ज्यूस
अनेक स्वयंपाक घरात आता सकाळच्या चहाची जागा फळांचा ज्यूस किंवा हेल्दी काढ्याने घेतली आहे. हिरव्या भाज्यांचाही अधिकाधिक वापर होऊ लागला असून, सकाळी नाष्ट्यासाठी मोड आलेले मूग, मटकी, उकडलेले चणे, दूध यांचा वापर होऊ लागला आहे.
चौकट-
भाकरीत वापरा सोयाबीन पीठ
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एक वळ तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी असावी. या भाकरीच्या पिठात प्रोसेस केलेले सोयाबीन पीठ मिसळले तर त्यापासून अधिक प्रोटिन्स मिळू शकतात. याशिवाय व्हिटॅमिन आणि प्रोटिन्स देणाऱ्या वेगवेगळ्या डाळींचा रोजच्या जेवणात वापर करावा. दिवसांतून किमान एकदा मोसंबी, संत्रा, टरबूज यांचा ज्यूस घ्यावा, नारळपाणी घ्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ मीनल बाकरे यांनी दिला आहे.
चौकट-बाहेरचे चमचमीत पदार्थ बंद
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक घरांमधून बाहेरचे चमचमीत पदार्थ मागविणे बंद करण्यात आले आहे. याशिवाय पिझ्झा, बर्गरसारख्या पदार्थांवर जवळपास बंदीच घालण्यात आली आहे. ब्रेड, पावसारख्या मैद्याच्या पदार्थांनाही टाळले जात असून, चायनीज, चिप्स, फरसाण यांसारख्या पदार्थांनाही गृहिणींनी किचनपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
कोट-
कोरोनाने घरातील बहुतेकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. आता सकाळी नाष्ट्यासाठी बहुतेकवेळा थालीपीठ किंवा इतर पदार्थांची मागणी करतो. याशिवाय चहाचे प्रमाण खूपच कमी झाले असून, फळांच्या ज्युसवर भर दिला जात असून, जेवणातही केवळ भाजीपोळी न घेता त्यात इतरही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आम्ही करतो.
- मनीषा मोरे, गृहिणी
कोट-
पूर्वी आमच्या मुलाला केवळ चपातीच आवडत असे, पण आता तोही ज्वारी, बाजरीची भाकरी आवडीने खातो. याशिवाय स्वयंपाकघरात दररोज लिंबू असतात लिंबूपाणी पिण्याकडेही घरातील सदस्यांचा कल वाढला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्या घरात पिझ्झा मागविला गेला नाही. किंबहुना कुणालाही त्याची आठवणसुद्धा येत नाही.
- मंगला पवार, गृहिणी
कोट-
आमच्या घरी दुपारच्या जेवणात ताक घेण्यास सुरुवात झाली आहे. दिवसातून किमान एकदातरी भाकरी केली जाते. सायंकाळी लागणारा स्नॅक्सही घरातच तयार होतो. त्यात पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. कधी कधी तर नुसते मोड आलेली मटकी परतवून त्यात कांदा, टमाटा टाकून खाल्ली जाते.
- वनिता जगताप