सीबीएसई दहावीतील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:26+5:302021-04-18T04:13:26+5:30
नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक ...
नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी परीक्षा रद्द केलेल्यांना नाशकातील विविध शाळांमधील सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा न देता पास होणार आहेत. सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाणे जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्याचप्रमाणे दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही ९० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात सीबीएसई मंडळाने परीक्षा न घेता सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. मात्र, आता पुढील प्रवेशासाठी आवश्यक गुणपत्रिका व गुणवत्ता क्रमवारीचे काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला असून राज्य व केंद्र सरकारने अकरावी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर एकसूत्रता असलेले धोरण निश्चित करण्याची पेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.
--
सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०
मुले - ८१५
मुली - ७५५
सीबीएसई शाळा - १८
---
पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता
सीबीएसई मंडळाने यापूर्वी विद्यार्थी हिताचा निर्णय घेत कौशल्याधारित विषयांचे गुण ग्राह्य धरून बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्रानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही, अशी तरतूद केली आहे. कोणताही विद्यार्थी नापास होणार नसेल तर कोरोना संकटात परीक्षा घेवून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.
- प्रशांत जाधव, पालक.
--
कोणत्याही परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे सीबीएसीई दहावीच्या परीक्षा घेणे धोक्याचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. परंतु, पुढील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने चिंता आहे.
- गौरी सिन्हा, पालक.
--
सीबीएसईने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला आहे, परंतु, आता विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वयातून राष्ट्रीयस्तरावर एकच घोरण निश्चित करणे आवश्यक झाले आहे. -अंजली परदेशी, पालक