‘आरोग्य’पेक्षा ‘मुक्त’चा अधिक आदर
By admin | Published: December 22, 2015 12:12 AM2015-12-22T00:12:17+5:302015-12-22T00:21:54+5:30
अरुण जामकर : मुक्त विद्यापीठाच्या वतीने सत्कार
नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे समाजातल्या तळागाळातील माणसांसाठी काम करीत असल्याने या विद्यापीठाचा कायम हेवा वाटला असून, मुक्त विद्यापीठाबद्दल आपल्याला नेहमीच आरोग्य विद्यापीठापेक्षा अधिक आदर वाटतो, असे उद्गार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले.
डॉ. जामकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल संपल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी डॉ. जामकर यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर वित्त अधिकारी पंडित गवळी उपस्थित होते. मुक्त विद्यापीठाकडे कमी मनुष्यबळ असूनही राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल डॉ. जामकर यांनी गौरवोद्गार काढले. तर कुलगुरू प्रा. डॉ. साळुंखे यांनी डॉ. जामकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रफुल्ल चिकेरूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)