सहाशे रुपयांचा अधिक भुर्दंड
By admin | Published: October 25, 2015 10:54 PM2015-10-25T22:54:22+5:302015-10-25T22:55:07+5:30
दिवाळीचा फराळ : महागाईमुळे पदार्थांचे दर भडकले
नाशिक : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई भडकल्याने त्याचा थेट परिणाम दिवाळीच्या फराळावर होणार आहे. तेल-तुपासह किराणा मालाचे दर प्रचंड वधारल्याने फराळाचे पदार्थही महागले असून, त्यामुळे यंदा एका कुटुंबाला साधारणत: सहाशे रुपयांचा अधिक भुर्दंड सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तेल, तूप, डाळींचे दर भडकल्याने गृहिणींना चांगलीच कसरत करावी लागत आहे. दिवाळीचा सण पंधरवड्यावर आल्यामुळे आता घरोघरी फराळाच्या पदार्थांची लगबग सुरू झाली आहे; मात्र किराणा मालाच्या वाढत्या दरामुळे बजेट सांभाळताना गृहिणींची बरीच दमछाक होत आहे.
शहरात अनेक बचत गटांच्या माध्यमातून फराळाचे पदार्थ तयार केले जातात. सध्या अनेक महिला नोकरी करीत असल्याने त्यांना फराळाचे पदार्थ घरी तयार करणे शक्य होत नाही.
अशी कुटुंबे फराळाचे रेडिमेड पदार्थ बचत गटांकडून घेणे पसंत करतात; मात्र महागाईमुळे यंदा या पदार्थांचे दरही जवळपास दुपटीने वाढले आहेत. साधारणत: एका चौकोनी कुटुंबाने फराळाचे सगळे पदार्थ प्रत्येकी एक किलो या प्रमाणात घेतल्यास गेल्या वर्षी सुमारे १,४०० रुपये खर्च येत होता. त्यात आता यंदा सहाशे रुपयांनी वाढ झाली असून, तेवढ्याच पदार्थांसाठी यंदा दोन हजार रुपये खर्च येत आहे. (प्रतिनिधी)