आरटीईच्या अजूनही हजारहून अधिक जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:20 AM2021-09-08T04:20:23+5:302021-09-08T04:20:23+5:30
नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही ...
नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील राखीव ४ हजार ५४४ जागांपैकी अजूनही हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. आरटीई अंतर्गत राज्यस्तरीय लॉटरी प्रक्रियेत संधी मिळूनही जवळपास १ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले प्रतीक्षा यादीत सुमारे ७६० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळून त्यातीलही केवळ १८४ विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश होऊ शकले आहेत.
नाशिक जिल्ह्यात आरटीई अंतर्गत जुलैअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास येते; मात्र यावर्षी १५ ऑगस्ट उलटूनही आरटीई अंतर्गत राबविली जाणारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७) सायंकाळपर्यंत ३ हजार २०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर प्रतीक्षा यादीतील १८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, जवळपास हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळूनही त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांना वारंवार वाढीव मुदत देऊनही त्यांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली आहे.