साडेतीन हजारांहून अधिक चारित्र्य पडताळणीचे अर्ज
By admin | Published: January 29, 2017 12:35 AM2017-01-29T00:35:39+5:302017-01-29T00:35:56+5:30
पोलीस आयुक्तालय : उमेदवारांची धावपळ; सर्व्हर डाउनची समस्या
नाशिक : महापालिका निवडणुकीत उमदेवारी करणाऱ्या उमेदवारांना पोलिसांकडील वर्तन व चारित्र्य पडताळणीचा दाखला आवश्यक आहे़ पोलीस आयुक्तालयाने या दाखल्यासाठी आॅनलाइन प्रकिया सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे साडेतीन हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत़ सायबर कॅफेतही इच्छुकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र असून, काही उमेदवारांना आॅनलाइन पद्धत क्लिष्ट वाटते आहे़ महापालिकेतील नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या बहुतांशी उमेदवारांना सोशल मीडियावरील अॅप्लिकेशन सोडता इंटरनेट वापराबाबत पुरेसे ज्ञान नाही़ त्यातच सायबर कॅफेचालकांना सर्व्हर डाउनची समस्या भेडसावत असून, चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी अर्ज करण्यास अडचणी येत आहेत़ त्यातच उमेदवारांकडे केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असून, त्यांची धावपळ वाढली आहे़ पोलीस आयुक्तालयातील वर्तन व चारित्र्य पडताळणी कार्यालयात उमेदवारांची गर्दी वाढली असून, आतापर्यंत तीन हजार ४०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केले आहेत, तर सर्व्हर डाउनची समस्या भेडसावत असल्याने आॅनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू होते़ या प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने तर काही उमेदवार आम्हाला त्वरित प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करीत आहेत़ वर्तन व चारित्र्य दाखल्यासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर प्रमाणपत्रासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, तर काही उमेदवार सायबर कॅफे चालकाऐवजी पोलीस आयुक्तालयास प्राधान्य देत आहेत़ त्यामुळे आयुक्तालयातील या दाखल्यांसाठी स्वतंत्र विभागात इच्छुक उमेदवारांची गर्दी होते आहे़ (प्रतिनिधी)