विभागात तीन हजारांहून अधिक बालकांचे मृत्यू
By संजय पाठक | Published: June 26, 2019 01:29 AM2019-06-26T01:29:46+5:302019-06-26T01:32:08+5:30
ग्रामीण आणि आदिवासी भागात शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होत असतानादेखील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नसून, गेल्या मार्च महिन्यापर्यंत उत्तर महाराष्टÑात ३ हजार १४३ बालकांचा बळी गेला आहे. नंदुरबार हा संपूर्ण आदिवासी जिल्हा कुपोषणाच्या कवेत असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात मात्र अहमदनगर या एका जिल्ह्यात सर्वाधिक ९४६ बालकांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे.
नाशिक : ग्रामीण आणि आदिवासी भागात शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होत असतानादेखील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नसून, गेल्या मार्च महिन्यापर्यंत उत्तर महाराष्टÑात ३ हजार १४३ बालकांचा बळी गेला आहे. नंदुरबार हा संपूर्ण आदिवासी जिल्हा कुपोषणाच्या कवेत असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात मात्र अहमदनगर या एका जिल्ह्यात सर्वाधिक ९४६ बालकांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. कुपोषणग्रस्त नंदुरबारमध्ये त्या तुलनेत कमी मृत्यू झाले असून, नाशिक जिल्ह्यात मात्र ४५१ जणांचा मृत्यू झाला आहे.
अर्थात, शासकीय यंत्रणेच्या म्हणण्यानुसार हे केवळ बालमृत्यू असून, ते सर्वच कुपोषणामुळे नाही तर ना ना आजारांनी बळी जातात. अगदी टीबी, हृदयातील दोष, न्युमोनिया यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक विभागात नंदुरबार हा सर्वाधिक कुपोषणामुळे ग्रासलेला जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्णात आठ आदिवासी तालुके आहेत. परंतु त्यापेक्षा सर्वाधिक बालमृत्यू दोन आदिवासी तालुके असलेल्या अहमदनगर जिल्ह्णात ९४६ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल जळगाव जिल्ह्णात ८३५ बालकांचे मृत्यू झाले असून, या भागात तेवढी कुपोषणाची तीव्रता नसतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्या खालोखाल नंदुरबारमध्ये ७०६ बालकांचे मृत्यू झाले आहेत. नाशिक जिल्ह्णात ४५१ बालकांचा मृत्यू झाला असून, सर्वात कमी म्हणजे २०५ बालमृत्यूची धुळे जिल्ह्णात नोंद आहे.
माजी आदिवासी मंत्र्यांच्या तालुक्यातील अवस्था
अहमदनगर जिल्ह्णात ९४६ बालमृत्यू झाल्याने येथील शासकीय उदासीनता अधोरेखित झाली आहे. अनेक वर्षे राज्याचे आदिवासी विकास मंत्री राहिलेल्या मधुकर पिचड यांच्या जिल्ह्णातच असे प्रकार होत असतील अन्य आदिवासी जिल्ह्णांचे काय? असा प्रश्नदेखील केला जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत अल्पशी घट
नाशिक विभागात गतवर्षीच्या तुलनेत बालमृत्यूत अल्पशी घट झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०१८ अखेरीस ३ हजार ७२ बालकांचा मृत्यू झाला होता. यंदा हा आकडा ३ हजार १४३ वर गेला आहे. मार्च २०१८ मध्ये विभागात सर्वाधिक बालमृत्यू अहमदनगर जिल्ह्णातच झाले होते. या जिल्ह्णात गेल्यावर्षी ९८१ बालमृत्यू होते ते यंदा ९४६ वर आले आहेत. जळगाव जिल्ह्णात गेल्यावर्षी ६५४ बालमृत्यू होते ते यंदा ८३५ झाले आहेत. नंदुरबारमध्ये गतवर्षी ७७० तर यंदा ७०६ बालमृत्यू आहेत. धुळ्यात गेल्यावर्षी २४० तर यंदा २०५ आणि नाशिक जिल्ह्णात गतवर्षी ४२७ तर यंदाच्या वर्षी ४५१ बालकांचा मृत्यू झाला आहे. यातील जळगाव जिल्हा सोडला तर बहुतांशी बालमृत्यूच्या संख्येची आकडेवारी गतवर्षीशी खूपच मिळतीजुळती असल्याने त्याविषयीदेखील तज्ज्ञांनी संशय व्यक्त केला आहे.
बालमृत्यू म्हणजे कुपोषणच नव्हे पण...
बालमृत्यू हे विविध कारणांनी होत असतात. त्यामुळे बालमृत्यू म्हणजे केवळ कुपोेषणच नाही असे सरकारी अधिकारी सांगतात. बालकांचे विविध आजारांमुळे मृत्यू होतात. अनेकदा त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत किंवा अन्य अनेक कारणे असतात, असे सांगितले जाते. तथापि, कुपोषणाचा बळी गेल्यानंतर होणाऱ्या साºया चौकशींचा ससेमिरा टाळण्यासाठीच कुपोषणाची फारशी नोंद केली जात नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. न्यूमोनिया हे मृत्यूचे प्रमाण सर्रास नोंदवले जाते.
राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. कोट्यवधी खर्च होऊनही त्यात फरक पडताना दिसत नाही. शासनाच्या मदतीला पूरक कार्य अनेक सेवाभावी संस्था करीत असल्या तरी, बालमृत्यूचे प्रमाण फार कमी होताना दिसत नाही. मार्च २०१९ अखेर झालेल्या शासकीय आकडेवारी-नुसार नाशिक विभागात ३ हजार १४३ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे योजनांचा फोलपणा उघड झाला आहे.