अटल भूजल योजनेतून सिन्नरच्या ८० गावांना अधिकचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:06+5:302021-07-15T04:12:06+5:30
सिन्नर : वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा बसत असल्याने सिन्नर तालुकावासीयांना पाण्याचे महत्त्व सर्वाधिक माहिती आहे. सिन्नर तालुक्याला अधिकचे पाणी मिळावे, ...
सिन्नर : वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा बसत असल्याने सिन्नर तालुकावासीयांना पाण्याचे महत्त्व सर्वाधिक माहिती आहे. सिन्नर तालुक्याला अधिकचे पाणी मिळावे, यासाठी नदीजोड प्रकल्पासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. अटल भूजल योजनेतूनही तालुक्यातील ८७ गावांना आता अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. अटल भूजल योजना तालुक्यासाठी वरदान ठरणारी असून लोकसहभागातून योजनेचा सूक्ष्म आराखडा तयार करणे गरजेचे आहे. योजना यशस्वी करण्यासाठी योजनेत समावेश असलेल्या ८७ गावांमधील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हातात हात घालून एकत्रित काम करावे, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
दीड वर्षापूर्वी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने अटल भूजल योजना अस्तित्वात आणली. सतत पाणीटंचाई असलेल्या गावांमधील पाण्याच्या स्रोताबाबत माहिती गोळा करून पाण्याची तूट भरून काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबरोबरच टंचाईग्रस्त गावशिवारातील भूजल पातळी कशी वाढेल याविषयीची विशेष उपाययोजना अटल भूजल योजनेंतर्गत करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सिन्नर आणि देवळा या तालुक्यांची निवड करण्यात आली असून सिन्नर तालुक्यातील ८७ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे.
अटल भूजल योजना यशस्वी करण्यासाठी बुधवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना गोडसे यांनी आवाहन केले. व्यासपीठावर प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, योगेश पाच्शापुरकर, विलास सानप, प्रवीण बधान आदी अधिकाऱ्यांसह संजय सानप, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पिराजी पवार आदी मान्यवर तसेच ८७ गावांचे सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योजेनेचे महत्त्व आणि योजनेची सविस्तर माहिती गावागावात पोहोचविण्यासाठी अटन भूजल योजेनेचे सादरीकरण करण्यात आले.
---------------------------------
भौगोलिक परिस्थितीवर आधारित आराखडा
अटल भूजल योजना प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रथम गावाच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित आराखडा तयार करावा, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करावा, गावशिवारात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या जलसंधारणाच्या कामाची दुरुस्ती, अस्तित्वात असलेल्या साठवण प्रकल्पांमधील गाळाचा उपसा काढावा, कार्यक्षम पाणी वापर पद्धतीचे महत्त्व अंगीकरण करावे, माती-दगड आण सिमेंटचे नाले बांधावेत. शेतशिवारातील विहिरींचे पुनर्भरण करावे, मातीचा प्रकार आणि जमिनीची धारण क्षमता तपासावी, २० ते ३० वर्षांपासूनच्या प्रर्जन्यमानाचा आढावा घ्यावा, पाणी आणि पिकांची संरचना करावी, या ठळक मुद्द्यांविषयीचे अभ्यासपूर्ण सादरीकरण यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले.
-----------------
सिन्नर येथे अटल भूजल योजनेविषयी आयोजित बैठकीत बोलतांना खासदार हेमंत गोडसे. व्यासपीठावर प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नीलेश केदार आदी. (१४ सिन्नर २)
140721\14nsk_17_14072021_13.jpg
१४ सिन्नर २