आणखी पाणीकपातीचे दाटणार ढग
By admin | Published: November 29, 2015 12:04 AM2015-11-29T00:04:02+5:302015-11-29T00:04:51+5:30
उद्या विशेष महासभा : दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत
नाशिक : जलसंपदा मंत्रालयाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात केल्यानंतर येत्या काही दिवसांत उद्भवणार्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठय़ाचे फेरनियोजन केले जाण्याची शक्यता असून, सोमवारी (दि.३0) होणार्या विशेष महासभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पुढील आठ महिन्यांत उपलब्ध पाणीसाठय़ात पुरवठा करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकेत मिळत आहेत. महासभेतील निर्णयाकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिकेला गंगापूर धरणातून २७00 दलघफू, तर दारणा धरणातील ३00 दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. महापालिकेने जुलै २0१६ अखेरपर्यंत ३१३७ दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती; परंतु जलसंपदा मंत्रालयाने ती फेटाळून लावत महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करतानाच गंगापूर धरणातून शेतीसाठीही तीन आवर्तने सोडण्याचे निश्चित केले. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक महापालिकेपुढे पाणीपुरवठय़ाबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शहरात एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी गंगापूर धरणातून रोज १२.३६ दलघफू इतके पाणी उचलले जात आहे. २३ नोव्हेंबरअखेर प्राप्त आकडेवारीनुसार गंगापूर धरणात २९९१ म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेला सदर साठा ८६ टक्के होता.
कश्यपी धरणात ३२ टक्के, तर गौतमी गोदावरीमध्ये २८ टक्के पाणीसाठा आहे. महापालिकेसमोर आरक्षित उपलब्ध साठय़ात पाणीपुरवठय़ाचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातूनच एकवेळ पाणीपुरवठा चालू ठेवतानाच एक दिवसाआड पाणीपुरवठा करता येईल काय, याची चाचपणी पाणीपुरवठा विभागामार्फत केली जात आहे. शहरात पहिल्यांदाच एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाला नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याने त्याचे तीव्र पडसादही उमटण्याची शक्यता आहे.
एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाल्यास दरमहा १८५ दलघफू पाण्याची बचत होणार असून, जुलैअखेर १४८३ दलघफू पाण्याची बचत होऊन महापालिकेला संभाव्य संकटाचा सामना करणे सोपे होणार आहे. सोमवारी होणार्या विशेष महासभेत याबाबत सदस्य काय भूमिका घेतात आणि महापौर काय निर्णय देतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)