सकाळच्या सत्रात भाड्यात कपात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:12 AM2019-08-31T01:12:03+5:302019-08-31T01:12:28+5:30
कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित नियमावलीत सकाळ आणि प्रथम सत्र यांना विभागण्यात आले असून, सकाळच्या सत्रातील दरांमध्ये घट करण्यात आली असून, महात्मा फुले कलादालनाचे दर निम्मे करण्यात आले आहेत.
नाशिक : कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित नियमावलीत सकाळ आणि प्रथम सत्र यांना विभागण्यात आले असून, सकाळच्या सत्रातील दरांमध्ये घट करण्यात आली असून, महात्मा फुले कलादालनाचे दर निम्मे करण्यात आले आहेत. या प्रस्तावित बदलांना स्थायी समितीसमोर ठेवून त्याला स्थायीची मंजुरी घेतल्यानंतर ही सुधारित दर सूची लागू करण्यात येणार आहे.
कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त लोकमतने प्रसिद्ध केलेल्या ‘नूतनीकरण अन्् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेत कालिदासच्या नियमावलीतील त्रुटींवर बोट ठेवण्यात आले होते. तसेच या त्रुटींमुळे रंगकर्मी आणि नाट्य व्यावसायिकांची असलेली नाराजी अधोरेखित करण्यात आली होती. त्यानंतर प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले, सुप्रिया पाठारे आणि विजय पाटकर यांनीदेखील त्रुटींबाबत रोष व्यक्त केल्यानंतर महापालिकेने नियमावलीत सुधारणा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही प्रस्तावित दर सूची तयार करण्यात आली आहे.
सकाळ आणि प्रथम सत्राला वेगळे दर आहेत. यापूर्वीच्या दरसूचीत सकाळ आणि प्रथम सत्राचे दर एकसारखे होते. मात्र नूतन सूचीमध्ये रंगीत तालीम, हौशी बालनाट्य, हौशी नाटक, शासकीय कार्यालयांच्या कार्यशाळा यांचे दर ४५०० वरून ३५०० रुपये करण्यात येणार आहेत, तर व्यावसायिक नाटक, शास्त्रीय गायन, स्थानिक गायक, गझल, मराठी गाण्यांचा कार्यक्रम, नृत्य यासाठी सकाळच्या सत्रातील शुल्क दहा हजार ऐवजी ७५०० रुपये असे अडीच हजार रुपयांनी घटविण्यात आले आहे, तर व्यावसायिक आॅर्केस्ट्रा, कार्यशाळा आणि अन्य कार्यक्रमांबाबतचे सकाळच्या सत्राचे शुल्क २० हजार ऐवजी १४ हजार करण्यात आले आहे.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्रातील दर कायम ठेवण्याचा प्रस्ताव असला तरी त्यातील पहिल्या रांगेतील तिकीट दर आणि अन्य रांगांमधील तिकीट दरातील तफावतीचा मुद्दा स्पष्ट करण्यात आलेला नाही.
फुले कलादालनाचे दर निम्म्यावर
महात्मा फुले कलादालनाच्या खालच्या मजल्यावर कलाप्रदर्शन हॉलचे दर २० हजारांवरून १० हजार करण्यात आले आहेत, तर तेथील चर्चासत्र आणि व्याख्यानमालेसाठीचे शुल्क १० हजारांऐवजी ५ हजार करण्यात आले आहे. दिवसा तयारीसाठी दालनाचे भाडे तीन तासांसाठी दोन हजारांऐवजी १ हजार, तर रात्री तयारी किंवा साहित्य ठेवण्यासाठी ५ हजारांऐवजी २५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर वरील मजल्यावर दिवसा चित्रशिल्प आणि कलाप्रदर्शनाचे दर २० हजारांऐवजी दहा हजार, चर्चासत्र व्याख्यानमालेसाठी ५ हजार रुपये, तर रात्री साहित्य ठेवण्यासाठीचे दर ५ हजारांवरून २५०० हजार करण्यात आले आहे.