सकाळी सरींचा वर्षाव; नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:17+5:302020-12-14T04:30:17+5:30

अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा ...

Morning showers; Suryadarshan is rare for Nashik residents | सकाळी सरींचा वर्षाव; नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ

सकाळी सरींचा वर्षाव; नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ

Next

अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे चक्रवात क्षेत्राची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.दक्षिण पूर्व-अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. मागील चार दिवसांपासून शहराच्या हवामानात मोठा बदल नाशिककरांना अनुभवायला येत अहे. रविवारी पहाटेच्या सुमारास दृश्यमानतादेखील कमी झाली होती. मध्यम सरींचा रिमझिम वर्षाव, दाटलेले धुके आणि सुटलेला थंड वारा असे काहीसे वातावरण अनुभवायला आले. यामुळे रविवारची सुटी असूनही शहरामधील जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून आली नाही. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.

---इन्फो---

बागायतदारांवर अस्मानी संकट

या वातावरण बदलामुळे बळीराजा धास्तावला आहे. कांदा, द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. द्राक्ष बागायतदारांनी डावणी रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य औषध फवारणी तसेच बागांमध्ये शेकोट्या पेटवून याेग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान केंद्राकडून करण्यात आले आहे. या विचित्र वातावरण बदलामुळे बळीराजा धास्तावला आहे. द्राक्षबागांची मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेताना बागायतदार दिसून येत आहेत.

---इन्फो---

बाष्प अन‌् आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ

शहरात हवामान बदलामुळे वातावरणात बाष्प व आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळी हवेत ९२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता मोजली गेली. तसेच संध्याकाळीसुध्दा आर्द्रतेचे प्रमाण जवळपास सारखेच राहिले. यामुळे नाशिककरांना विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. वातावरण थंड झाल्यामुळे गोदाघाटावर तसेच शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नाशिककरांनी थंडीचा बचाव करण्यासाठी रविवारी दिवसभर उबदार कपड्यांचा वापर करण्यावर भर दिला.

--इन्फो--

उत्तरेचे थंड वारे राेखले गेले

उत्तरेकडून निर्माण होणारे थंड वारे ढगाळ हवामानामुळे राेखले जात आहेत. यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे; मात्र वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. शहराचा किमान तापमानाचा पारा अचानकपणे वाढल्याने थंडीची तीव्रता घटलेली आहे. ढगाळ हवामान आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाती क्षेत्रामुळे पडणाऱ्या हलक्या सरींंमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे, असे हवामान केंद्राचे प्रमुख सुनील काळभोर यांनी सांगितले.

-इन्फो--

...म्हणून थंडी लांबणीवर

अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे थंडीचे दिवस लांबणीवर गेले आहेत. थंडी लांबण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. २०१२ ते २०१८ पर्यंत ५ ते ७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची शहरात नोंद झाली होती; मात्र, पर्यावरणीय असमतोल, निसर्गचक्रातील बदल, चक्रीवादळे, वाऱ्यांच्या बदलणाऱ्या दिशा यामुळे वातावरणात कमालीचा बदल होत आहे. यामुळे यंदा पुन्हा कडाक्याच्या थंडीचा कालावधी लांबणीवर पडला आहे.

--कोट---

द्राक्षबागांवर संकटच आहे. वातावरणामुळे सकाळी औषध फवारणी करण्यावर भर देत आहोत. रिमझिम पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे. झाडांची कार्य करण्याची क्षमता थांबली. फ्लॉवरिंगचा टप्पा संकटात आहे. द्राक्षबागांवर कॅल्शियम फवारणी तसेच भुरीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून औषध फवारणीवर भर देत आहोत.

-सचिन काकड, द्राक्ष बागायतदार

Web Title: Morning showers; Suryadarshan is rare for Nashik residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.