मॉर्निंग वॉक बनले गप्पा मारण्याचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:36+5:302021-09-23T04:16:36+5:30
कळवण : शहरात दररोज ‘मॉर्निंग वाॅक’ला जाणाऱ्यांची संख्या लॉकडाऊन, संचारबंदी व कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घटली होती. तिसऱ्या लाटेच्या ...
कळवण : शहरात दररोज ‘मॉर्निंग वाॅक’ला जाणाऱ्यांची संख्या लॉकडाऊन, संचारबंदी व कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घटली होती. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी डेंग्यू, चिकुन गुन्याची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तशी पहाटे आणि सायंकाळी रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दीही वाढली आहे. अजूनही काही नागरिक आजाराला आमंत्रण देत फिरायला जाणे व माॅर्निंग वाॅकला जाणे पसंत करत आहेत. नियमांचे पालन न करता मॉर्निंग वॉक म्हणजे गप्पा मारायची केंद्र झाली आहेत.
शरीराचे चक्र बिघडवू नये म्हणून अनेक नागरिक शुद्ध हवा घेण्यासाठी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक घटले आहे तर नियमित व्यायाम तसेच माॅर्निंग वॉक करणाऱ्यांनी सवय मात्र मोडलेली नाही, त्यांची पहाटेची दिनचर्या सुरूच आहे. घरात कंटाळलेले अनेकजण पहाट उजाडताच मॉर्निंग वॉकच्या नावाखाली मोकळ्या रस्त्यांवरून उघड तोंडाने फिरत आहेत. मॉर्निंग वॉक म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी गप्पा मारण्याचे केंद्र झाले आहे.
------
अद्याप अनेकांना वाटेना कोरोनाची भीती
कोरोना संसर्ग कमी झाला तरी इतर आजारांची रुग्णसंख्या वाढत असताना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने पुन्हा मास्क वापरा, नियमांचे पालन करा अशा सूचना दिल्या आहेत. काही नागरिक अजूनही मॉर्निंग वॉकला नियम पाळत नाही, एकत्रित व्यायाम करणे व गप्पा मारणे असे प्रकार काही ठिकाणी आढळून येतात. याबाबत पुरुषांना टोकले तर ते हसण्यावर घालवतात मात्र महिलांना राग अनावर होतो. त्यामुळे या मॉर्निंग वॉकद्वारे आपण कोरोनाला घरी येण्याचे आमंत्रण तर देत नाही ना, असा प्रश्न अद्यापही या नागरिकांना पडलेला नाही.
-------------------------
मी अनेक वर्षांपासून मॉर्निंग वाॅकसाठी पहाटे घराबाहेर पडतो. शुद्ध हवा मिळाल्याने दिवसभर प्रसन्नता वाटते. सूक्ष्म व्यायाम, योगा, प्राणायम, ध्यान करतो. कोरोनाच्या नियमांचे पालन करून वयस्कर, तरुण, महिला, युवक-युवती मॉर्निंग वॉक करतात.
- उदय मालपुरे, कळवण