मॉर्निंग वॉकने आरोग्यवृद्धी की कोरोनाचा राजमार्गाने गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:44+5:302021-05-21T04:15:44+5:30
नाशिक : कोरोना विषाणू संसर्गामुळे सारे काही लॉकडाऊन असताना नागरिकांच्या घराबाहेर वावरण्यावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाने ...
नाशिक : कोरोना विषाणू संसर्गामुळे सारे काही लॉकडाऊन असताना नागरिकांच्या घराबाहेर वावरण्यावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाने मॉर्निंग वॉक, सायकलिंग, जॉगिंग सारे काही बंद आहे. तरीही शहराच्या काही भागांत नागरिक घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी निघू लागले आहेत. मात्र, सध्याच्या काळातील मॉर्निंग वॉकने खरोखर आरोग्य वृद्धी होते की इतर नागरिकांशी संपर्क आल्याने कोरोनाला घरात प्रवेश करण्याचा राजमार्ग मिळतो, अशी अवस्था आहे. सध्याच्या काळातही नियमित माॅर्निंग वॉकला बाहेर जाणारे अनेक नागरिक बाधित झाल्याने मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केवळ घरात करणेच योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मैदानावर सुरक्षित वावरण्याचा नियम पाळून, चेहऱ्यावर मास्क बांधून काही नागरिक अद्यापही मॉर्निंग वॉक करीत आहेत. शहरातील विविध भागांत, रस्त्यांवर अनेक नागरिक जॉगिंगदेखील करीत आहेत. प्रारंभी काही जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्यांना मनपा प्रशासनाच्या वतीने दंडदेखील करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर यंत्रणा कोरोनाशी संबंधित कामकाजात व्यग्र झाल्याने त्या कारवाईत सातत्य राहिले नाही. मास्कचा वापर करून तसेच सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करून जॉगिंग करायला किंवा वॉक करायला काही हरकत नसावी, असेदेखील काही नागरिकांचे मत आहे. मात्र, त्याऐवजी ज्यांना योगा येत असेल त्यांनी घरातल्या घरात थोडेसे चालून आणि योगासने किंवा अन्य आसने करून त्याची भर काढावी. तसेच आसने येत नसल्यास सूर्यनमस्कारासारख्या मूलभूत योग आसनाचा उपयोग करून स्नायूंना बळकटीचा आधार देता येणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी अद्यापदेखील व्यायामाच्या नावाने किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये, हेच त्यांच्यासाठी हितकारक आहे.
अनेक महिन्यांपासून घरातच होतो. घरातच वॉकिंग करून आपल्या आरोग्याची काळजी घेत होतो. मात्र आठवडाभरापासून प्रमाण कमी झाल्याने तसेच पावसानंतर हवेतील गारठा वाढल्याने सकाळी थोडा वेळ घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक करीत आहे.
नामदेव माळोदे, ज्येष्ठ नागरिक
---------
गत वर्षभरापासून जाॅगिंग जवळपास बंद झाले होते. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने तसेच पावसामुळे हवेतही आल्हाददायक गारठा वाढल्याने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून थोडेसे जॉगिंग करायला दोन दिवसांपासूनच सुरुवात केली आहे.
शैलेश देशमुख, नागरिक
--------------------
ही डमी आहे.