मृत्युदराचा वेग तिपटीने वाढला; महिनाभरात १०३ मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:09 AM2020-06-20T00:09:28+5:302020-06-20T00:31:09+5:30
जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात होत असलेली प्रचंड वेगाने वाढ प्रशासनाच्या उरातदेखील धडकी भरवणारी आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंतच्या महिनाभरात रुग्णांच्या मृत्यूचा वेग तिपटीने वाढला असून, या काळात जिल्ह्यात १०३ मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
धनंजय रिसोडकर ।
नाशिक : जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात होत असलेली प्रचंड वेगाने वाढ प्रशासनाच्या उरातदेखील धडकी भरवणारी आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंतच्या महिनाभरात रुग्णांच्या मृत्यूचा वेग तिपटीने वाढला असून, या काळात जिल्ह्यात १०३ मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मयतांच्या संख्येत शुक्रवारी सहाने वाढ होऊन नाशिक जिल्ह्यातील एकूण मयतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या बाधित आणि मृत्यू वेगाची तुलना ही राज्यातील मेट्रो सिटीबरोबर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील पहिला मृत्यू ५ मे रोजी झाला होता. त्यानंतरच्या गत ४२ दिवसांत नाशिक महापालिकेच्या हद्दीत ५०हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. मेपासून झालेल्या मृत्यूमध्ये जवळपास निम्मे मयत हे नाशिकचे नागरिक आहेत. त्यामुळे नाशिक महापालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अधिकच संभ्रमित झाली आहे. मृत्यूदराचा हा वेग कमी करण्यावरच आता आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.गत २५ बळी चार दिवसांत
जिल्ह्यातील पहिला मृत्यू ८ एप्रिलला झाल्यापासून प्रारंभीच्या २५ बळींचा टप्पा गाठला जाण्यासाठी १० मे अर्थात महिनाभराहून अधिक काळ उजाडला होता, तर त्यानंतरचा दुसरा २५ बळींचा आकडा गाठण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागला. मात्र, त्यानंतर प्रत्येक २५ बळींचा टप्पा हा अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत पूर्ण झालेला आहे. सव्वाशेनंतरचा २५ बळींचा टप्पा, तर अवघ्या चार दिवसांत गाठला गेला आहे. म्हणजे पहिल्या २५ बळींसाठी महिना, तर गत २५ बळी अवघ्या चार दिवसांत गेले आहेत. मृत्यूचा हा वेगच यंत्रणेसह नागरिकांच्या दृष्टीने जीवघेणा ठरत आहे.
६० वर्षांवरील ५५ जणांचा समावेश
मयत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ५५ रुग्ण हे ६० वर्ष किंवा त्यावरील वयोगटातील आहेत. २० ते ४० या वयोगटांतील २० रुग्णांचा समावेश आहे, तर अन्य ७६ रुग्ण ४१ ते ५९ या वयोगटांतील आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मध्यमवयीन वयोगटांतील असल्याने या वयोगटातील नागरिकांना अधिक धोका आहे. सर्व मयतांमध्ये बजरंगवाडीची २० वर्षांची महिला ही सर्वाधिक अल्पवयीन होती. शहरातील ती पहिली मयत रुग्ण होती. मयतांमध्ये तब्बल ५२ महिलांचादेखील समावेश आहे. उर्वरित मयतांमध्ये १०१ पुरुषांचा समावेश आहे. मह
ानगरात ४२ दिवसांत ५१ बळी
नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित २९ मार्चला निफाड तालुक्यातील लासलगावचा होता, तर जिल्ह्यातील पहिला कोरोनाबळी हा ८ एप्रिलला मालेगावमधून झाला होता. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर नाशिक महानगरातील पहिला कोरोनाबळी जाण्यास ५ मे उजाडला होता. तोपर्यंत नाशिक महानगरात एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालेला नव्हता. त्यानंतर नाशिक महानगराने ५० बळींचा टप्पा अवघ्या
४२ दिवसांत ओलांडला आहे. आतापर्यंत नाशिक शहरात ५१, मालेगावला ६९, नाशिक ग्रामीण २०, तर नाशिक जिल्ह्याबाहेरील दहा बळींचा समावेश आहे.