नमाज, कुराणपठणासाठी मशिदी गजबजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:53 AM2018-05-20T00:53:34+5:302018-05-20T00:53:34+5:30
रमजान पर्वला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत दोन उपवास पूर्ण झाले आहेत. रमजाननिमित्त शहर व परिसरातील मशिदींमध्ये पहाटेपासून सुरू होणारी लगबग रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळत आहे. नमाजपठण, कुराणपठणासाठी समाजबांधवांची मशिदींमध्ये गर्दी होत आहे.
नाशिक : रमजान पर्वला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत दोन उपवास पूर्ण झाले आहेत. रमजाननिमित्त शहर व परिसरातील मशिदींमध्ये पहाटेपासून सुरू होणारी लगबग रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळत आहे. नमाजपठण, कुराणपठणासाठी समाजबांधवांची मशिदींमध्ये गर्दी होत आहे. रमजान पर्वाची एकूण तीन खंडात विभागणी करण्यात आली आहे. कृपाखंड, मोक्षखंड, नरकापासून मुक्ती प्रत्येक खंड दहा दिवसांचा असल्याची माहिती धर्मगुरू देतात. सध्या रमजानचा पहिला खंड सुरू आहे. रमजान पर्वला अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात मुस्लीमबांधव अधिकाधिक वेळ धार्मिक कार्यासाठी देताना दिसून येतात. यंदा मे महिन्याच्या पंधरवड्यातच रमजान पर्व आले असून, सुमारे पंधरा तासांचा निर्जळी उपवास (रोजा) समाजबांधवांकडून केला जात आहे. पहाटे तीन वाजताच मुस्लीम बहुल परिसर जागा होत असून, सकाळी उपवास ठेवताना अल्पोपहार घेण्याची प्रथा आहे. या प्रथेलाच ‘सहेरी’चा विधी असे म्हटले जाते. जुने नाशिकमधील नानावली, कथडा, बागवानपुरा, चौकमंडई, नाईकवाडीपुरा, कोकणीपुरा, मुलतानपुरा या परिसरासह वडाळागाव परिसरातही पहाटे अडीच वाजेपासूनच काही युवकांचे ग्रुप विविध मुस्लीम बहुल भागात जाऊन ‘सहेरी’साठी समाजबांधवांना जागे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी डफलीचा वापर करत धार्मिक काव्यपंक्तीचे एका आवाजात पठणावर पहाट जागविणारे युवक भर देत आहेत. जुन्या नाशिकमधील शहीद अब्दुल हमीद चौकात रमजानच्या हंगामातील ‘मिनी मार्केट’ थाटले आहे. या बाजारात संध्याकाळी पाच वाजेपासून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येते. विविध प्रकारची फळे, खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थ व फळांना मागणी वाढली आहे.
ओल्या खजूरचे विविध प्रकार बाजारात
उपवास सोडण्यासाठी प्राधान्याने ओली खजूर समाजबांधवांकडून प्रथमत: सेवन केली जाते. यामागे धार्मिक प्रथा पाळणे हा उद्देश जरी असला तरी खजूरच्या माध्यमातून शरीराला मिळणारी प्रथिने, लोह व ऊर्जा देणे हा शास्त्रीय उद्देशही असतो. दिवसभरच्या निर्जळी उपवासामुळे शरीरात आलेला थकवा घालविण्यासाठी ओली खजूर या महिन्यात अधिक सेवन केली जाते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर ओल्या खजूरची उलाढाल होताना दिसून येत आहे. ओल्या खजूरचे वेगवेगळे प्रकार बाजारात विक्रीसाठी आले आहेत. तीस रुपये तर तीनशे रुपये असा पावकिलोचा भाव आहे. खजूरचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.