खर्डे गावात डास प्रतिबंधात्मक धुरळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:30+5:302021-07-28T04:14:30+5:30
खर्डे : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात चिकनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे वृत्त मंगळवारी (दि. २७) ...
खर्डे : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात चिकनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे वृत्त मंगळवारी (दि. २७) रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खर्डे, ता. देवळा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी संपूर्ण गावात डास प्रतिबंधात्मक धुरळणी करण्यात आली. डेंग्यू व चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण खर्डे व परिसरात आढळून येत असून, उपचारासाठी येथील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने याची दखल घ्यावी, या आशयाचे वृत्त (दि. २७) रोजी प्रसिद्ध होताच देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांनी दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकांना प्रतिबंधात्मक धुरळणी करण्याच्या सूचना करून सतर्क राहण्याचे सूचित करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना डेंग्यू व चिकनगुनिया रोखण्यासाठी आरोग्य तपासणी व जनजागृती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यात चिकनगुनिया, डेंग्यूसारख्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून, ग्रामीण भागातील सर्वच दवाखाने या आजाराच्या रुग्णांनी भरलेले दिसून येत आहेत. कोरोना महामारी आजार कुठेतरी आटोक्यात येत आहे. त्यातून जनता सावरत नाही तोच नवनवीन आजार उद्भवू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत पुन्हा भर पडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावागावांत गाजर गवत वाढले असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
------------------
पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा फैलाव होतो. पंचायत समितीमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना प्रतिबंधात्मक धुरळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. डास उद्भव होणार नाही म्हूणन एक दिवस कोरडा पाळावा , वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
डॉ. सुभाष मांडगे, आरोग्य अधिकारी, देवळा पंचायत समिती
----------------------
खर्डे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावांत डास प्रतिबंधात्मक धुरळणी करताना कर्मचाऱ्यांसमवेत ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी. (२७ खर्डे)
270721\27nsk_10_27072021_13.jpg
२७ खर्डे