नाशिक शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी फुटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:18 AM2018-07-03T01:18:51+5:302018-07-03T01:19:08+5:30
शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयुक्तांनी स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे काही हजार इमारतींचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयुक्तांनी स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे काही हजार इमारतींचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कपाटकोंडीचा विषय गाजत आहे. इमारतीचे बांधकाम करताना कपाट बांधण्यासाठी असलेली जागा वेगळी ठेवल्यास ती मुक्त असतानादेखील सहा हजार इमारतींमध्ये कपाटाची जागा सदनिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रकारचे काम करताना काही प्रमाणात अनियमित कामे करण्याची तरतूद आहे, परंतु अशा शिथिल नियमावलीपेक्षा अधिक बांधकाम करण्यात आल्याने अशा इमारतींना पूर्णत्वाचे दाखले देण्यासच महापालिकेने नकार दिला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक शेंडे रुजू असताना हा प्रकार उघड झाला. त्यावेळी असलेले आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नियमितीकरणास नकार दिला. त्यानंतर विकासकांच्या संघटनांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले, परंतु हा प्रश्न सुटलेला नाही. दरम्यान, मध्यंतरी मंत्रालयातील एका बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला होता. परंतु हा अत्यंत संदिग्ध आणि कायद्यात बसविण्याविषयी शंका निर्माण करणार होता. सहा मीटर तसेच साडेसात मीटर कॉलनीरोड असलेल्या ठिकाणच्या इमारती यामुळे अडचणीत असल्याने भविष्यात ज्या कोणाला बांधकाम करायचे असेल त्याला एकूण नऊ मीटर रस्ता रुंदीच्या हिशेबाने जागा सोडावी लागणार आहे. बांधकाम नियमावलीच्या कलम २१० मध्ये अशाप्रकारची तरतूद शोधून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्यात अधिसूचना जारी करून त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आलेल्या हरकतींची आयुक्तांनी सुनावणी घेतली आणि ती पूर्ण केली तरी अंतिमत: स्थायी समितीवर प्रस्ताव मांडण्यासाठी आचारसंहितेचा अडसर होता. आधी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदार संघ आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंहितेच्या आचारसंहितेमुळे हा विषय रखडला होता. परंतु आता मात्र आयुक्तांनी हा प्रस्ताव स्थायी समितीवर पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळेच त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
विकासकांच्या भेटीगाठी चर्र्चा
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कपाटकोंडी फुटणारा प्रस्ताव दाखल होणार असून, तसे ज्ञात झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी विकासकांना बोलावून चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्तांनी सदरचा प्रस्ताव पाठविला तरी फेटाळण्याचा अधिकार असल्याचा दावा करीत संबंधितांनी वेगळीच बोलणी सुरू केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.