वडांगळीत जावयाची सवाद्य धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 04:38 PM2019-03-26T16:38:33+5:302019-03-26T16:39:02+5:30
वडांगळी : केरसुणीचे बाशिंग कांद्या लसणाच्या मुंडावळ्या, फाटक्या चपलांचा हार अशा पेहरावात येथील जावयाची गाढवावरून गावातून सवाद्य धिंड काढण्यात आली.
शिमग्याच्या सणास जावयाची गाढवावर बसवून धिंड काढण्याची प्रथा वडांगळीकर गेल्या सुमारे पावणे दोनशे वर्षांपासून जोपासत आहे. यंदाच्या वर्षीही ही परंपरा टिकविण्याचे आव्हान युवकांपुढे ठाकले होते. पण तत्पूर्वी जावई शोधाबरोबरच गाढवाचाही शोध घेण्याचे आव्हान युवकापुढे ठाकल्याचे चित्र दिसून येत होते. पण काहीही झाले तरी प्रथेत खंड पडता कामा नये अशी खुणगाठ येथील युवकांनी बांधली होती. त्यानुसार सोमवारी रंगपंचमीच्या मुहूर्तावर येथील दुचाकी दुरूस्तीचे व्यावसायिक चंद्रकांत बंडू खुळे यांचे जावई रामकृष्ण भगीनाथ घुमरे यांची यावर्षी गाढवावरून धिंड काढण्यात आली.सासऱ्याच्या कुंडलीतील दशमग्रह समजल्या जाणाऱ्या जावयाची एरवी मोठी खातरदारी करण्याचे काम सासरकडील मंडळी करताना दिसतात. त्याच्या आदरतिथ्यात थोडीही कसर होणार नाही याची काळजी घेतली जाते. तथापि, शिमग्याच्या (होळी) सणाला त्याच जावयाची गाढवावर बसवून त्याची गावातील धिंड काढून वडांगळीकर अनोख्या पध्दतीने धुळवड खेळतात. गेल्या पावणे दोनशे वर्षांपासून ही प्रथा अखंडित सुरु आहे.घुमरे हे दुचाकी दुरूस्तीचे काम करतात ते या गावीच स्थायिक झाल्याने त्यांचीच यावर्षी धिंड काढण्याची कल्पना येथील युवकांना सुचली. त्यानुसार सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घुमरे हे आपल्या दुकानात दुचाकी दुरूस्त करत असताना दीपक खुळे, गिरीश खुळे, धनंजय खुळे, शुभम खुळे, गणेश खुळे आदी युवकांनी त्यांना घेराव घातला व त्यांना धिंडीसाठी गळ घालण्यात आली. प्रारंभी त्यांनी नकार दिला. पण येथील युवकही हार मानणारे नव्हते त्यांनी घुमरे यांची मनधरणी करत धिंडीसाठी राजी केले. दुपारी चारच्या सुमारास बँड पथकास पाचारण करून बस स्थानक परिसरातून धिंडीस प्रारंभ झाला. गावातील युवक मोठ्या संख्येने यात सहभागी होत धिंडीपुढे नाचत होते. गल्लोगल्लीतून रंग व पाणीरूपी अक्षतांची उधळण करीत घुमरे यांचे स्वागत केले जात होते.गावातून धिंड मिरवल्यानंतर यजमान असलेल्या चंदू खुळे यांच्या घरी सदर मिरवणूक थांबवण्यात आली.