उपधान तपातील साधकांची सवाद्य शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:50 PM2019-02-26T23:50:52+5:302019-02-27T00:31:33+5:30
लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाम मध्ये सुरू असलेल्या उपधान तपातील साधकांची मंगळवारी नाशिकरोड परिसरातून सजविलेल्या बग्गीमधून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
नाशिकरोड : लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाम मध्ये सुरू असलेल्या उपधान तपातील साधकांची मंगळवारी नाशिकरोड परिसरातून सजविलेल्या बग्गीमधून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो जैन साधू-साध्वी व हजारो जैन बांधव उपस्थित होते.
लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् तीर्थधाम मध्ये गेल्या ४८ दिवसांपासून गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या अधिपत्याखाली उपधान तप सुरू आहे. उपधान तपामध्ये विविध राज्यातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत व महिला साधक सहभागी झाले आहेत. उपधान तपाच्या सांगता निमित्त मंगळवारी सकाळी ९ वाजता आर्टिलरी सेंटररोड श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरापासून उपधान तपात सहभागी झालेल्या साधकांची शोभायात्रा काढण्यात आली होती. विविध ठिकाणहून सजवून आणलेल्या बग्गीमध्ये साधक व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या अग्रभागी धार्मिकतेचे प्रतीक म्हणून इंद्रध्वजा त्यानंतर घोडेस्वार, बॅण्डपथक, विविध राज्यांच्या कलाकारांनी प्रादेशिक नृत्य व कला सादर करत सहभागी झाले होते. बग्गीमध्ये बसलेले साधक राजेशाही पेहराव करून सहभागी झाले होते.
दोन किलोमीटर लांब शोभायात्रा
शोभायात्रेत जवळपास ४० बग्ग्या, घोडेस्वार, बॅण्ड-ढोल पथक, विविध राज्यांतील कलाकार, जैन बांधव, महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्याने जवळपास दोन किलोमीटर लांब शोभायात्रा होती. शोभायात्रेतील श्री शांतीनाथ भगवानचा चंदेरी रथ, तसेच पूज्य आचार्य रामचंद्र सुरीश्वरजी महाराज, पूज्य आचार्य महाबल सुरीश्वरजी महाराज सहभागी झाले होते. ४८ दिवसांचे उपधान तप पूर्ण केल्यामुळे साधकांमध्ये प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण पसरलेले दिसत होते. गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, आचार्य मुक्तिप्रभ सुरीश्वरजी, आचार्य अक्षयभद्र सुरीश्वरजी महाराज, आचार्य भव्यभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य भवनभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य पुण्यप्रभ सुरीश्वरजी महाराज यांच्यासह शेकडो जैन साधू-संत, साध्वी एका ठिकाणी उभे राहून शोभायात्रेतील साधक, जैन बांधव, भगिनी यांना आशीर्वाद देत होते. पोलिसांनी शोभायात्रा मार्गावर योग्य नियोजन केल्याने शोभायात्रा मोठ्या उत्साहात दुपारी ११.३० वाजता आर्टिलरी सेंटररोड येथील मनपाच्या मैदानावर समाप्त झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी संघपती कन्हैयालाल कर्नावट, डॉ. राजेंद्रकुमार मंडलेचा, डॉ. पी. एफ. ठोळे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, आयोजक संजय लुणावत, पृथ्वीराज बोरा, चेतन बोरा, संदीप कर्नावट, संतोष धाडीवाल, गिरीश शाह, प्रवीण लोढा, महेंद्र धाडीवाल, महेश शाह, सुनील बेदमुथा, अभय धाडीवाल, अॅड. सुशील जैन, विजय चोरडीया, अजित संकलेचा, सुनील चोरडीया, योगेश भंडारी, पारस संकलेचा, राजू बोथरा, वर्धमान जैन, विनय कर्नावट, रोशन टाटीया, अमोल पारख, प्रकाश लोढा, अमलोक भंडारी, अशोक कोचर, शैलेश चोरडिया, डॉ. शीतल पटनी, देवेन शाह, रूपेश चोपडा, अल्पेश खिंवसरा आदी उपस्थित होते.
अकरा वर्षीय मुलीचा सहभाग
४८ दिवसांचा उपधान तपात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विरती पीयूश संचेती ही अकरा वर्षाची मुलगी सहभागी होऊन तिने उपधान तप पूर्ण केले. साध्वी स्मितदर्शनाजी म.सा., हितधर्माश्रीजी म.सा. यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली उपधान तप पूर्ण करता आला असे साधक विरती संचेती हिने सांगितले. उपधान तपात १९७ साधक सहभागी झाले होते.
उपधान तपाची आज समाप्ती
लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् तीर्थधाममध्ये गेल्या ४८ दिवसांपासून सुरू असलेल्या उपधान तपाची सांगता बुधवार n(२७ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता मोक्षमाळ कार्यक्रमाने होणार आहे. तपातील साधकांना ‘नवकार मंत्र जप करण्याचा अधिकार’ प्राप्त झाला. गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, आचार्य, साधू, साध्वी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची सांगता होणार आहे.
फुलांची-दिव्यांची मनमोहक सजावट
कलापूर्णम तीर्थधाममध्ये संध्या महापूजा, स्त्रोत भक्ती व सत्कार कार्यक्रमानिमित्त फुलांची व दिव्यांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी उपधान तपातील साधकांची शोभायात्रा झाल्यानंतर कलापूर्णम तीर्थधाममध्ये सायंकाळी संध्या महापूजा व स्त्रोत भक्ती कार्यक्रम पार पडला. तसेच साधक, आयोजक व उपधान तप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत करणारे, वेगवेगळ्या एजन्सी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त कलापूर्णम तीर्थधाम व मंदिरात सुगंधित फुलांची, फुलांच्या माळांची व रांगोळी काढुन आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्वत्र काचेच्या ग्लासमध्ये लावलेले दिव्यांचा मंद प्रकाश सजावटीची शोभा वाढवत होता. यावेळी जैन साधू-साध्वी, बांधव-भगिनी उपस्थित होते.