औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ; गतवर्षी ९८ टक्क्यांहून अधिक प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:56 PM2020-07-19T16:56:32+5:302020-07-19T17:04:22+5:30
गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असून, त्यामुळेच गतवर्षी पदवीला ९८.०२ टक्के तर पदविकेला ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. त्यामुळे बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियेची चाचपणी करताना औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थी व पालकांसाठी उत्तम ठरू शकणारा आहे.
नाशिक : बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियेची चाचपणी करताना औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थी व पालकांसाठी उत्तम ठरू शकणारा आहे. नाशिक विभागात औषधनिर्माण शास्त्र पदवीसाठी एकूण ५३ महाविद्यालयांमध्ये ४ हजार १५० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, ७६ महाविद्यालयांमध्ये पदविकेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ हजार ९१५ जागा उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असून, त्यामुळेच गतवर्षी पदवीला ९८.०२ टक्के तर पदविकेला ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश झाले होते.
आयसीएस व सीबीएसईसोबतच एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांकडूनही पुढील प्रवेशासाठी पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. यात बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीसोबतच औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदविका असे अन्य पर्याय उपलब्ध आहेत. विभागातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २० बी फार्मसी महाविद्यालयांमध्ये बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या १४७० जागा उपलब्ध असून, डी.फार्मसाठीच्या २४ महाविद्यालयांमध्ये १५३०, अहमदनगरमधील १४ बी.फार्मसी महाविद्यालयांमध्ये १०८०, तर २२ डी.फार्मसी महाविद्यालयांमध्ये १३८०, धुळ्यात बी.फार्मसीच्या ८ महाविद्यालयांध्ये ७८० तर, डी फार्मसीच्या ११ महाविद्यालयांमध्ये ७७० जागा उपलब्ध आहे. जळगावात बी.फार्मसीच्या आठ महाविद्यालयांमध्ये ६०० जागा असून, डी.फार्मसीच्या १४ महाविद्यालयांमध्ये ८८५ प्रवेशांची क्षमता आहे. नंदुरबारमध्ये बी.फार्मसी अभ्यासक्रमाची केवळ तीन महाविद्यालये असून, येथे २२० विद्यार्थी क्षमता आहे, तर डी.फार्मसीसाठी पाच महाविद्यालयांमध्ये ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. विभागात नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणारी यातील विद्यापीठांशी संलग्न एकूण ५३ औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालये असून, ७६ महाविद्यालयांध्ये औषधनिर्माण शास्त्र पदविकेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.