माता न तू वैरिणी : अनैतिक संबंधात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाचा सख्ख्या आईनेच काढला काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 10:29 PM2021-01-02T22:29:05+5:302021-01-02T22:34:14+5:30
गुन्ह्याची कबुली देत अनैतिक संबंधामध्ये मुलाचा अडसर निर्माण होऊ लागल्याने त्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले.
नाशिक : आपल्या पहिल्या पतीपासून जन्मलेल्या मुलाचे एक दोन नव्हे तर सात वर्षे सांभाळ करत वाढविलेल्या चिमुकल्याचा सख्ख्या आईनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची ह्रदयद्रावक घटना आडगाव परिसरातील साईनगर भागात घडल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आठवडाभरापुर्वी या चिमुकल्याचा अंगणात खेळताना मृत्यू झाल्याचा बनाव करत जखमी अवस्थेत तिच्या आईने बालकाला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.
साईनगर येथे अंगणात खेळताना मोहित घनश्याम जाधव नामक एका सातवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हा शासकिय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरुन आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मुलाचा मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात न घेता जिल्हा रुग्णालयात दाखल करणारी आई संशयित सुलोचना सोमनाथ कुऱ्हाडे व संशयित आरोपी तिचा पती सोमनाथ ऊर्फ योगेश वसंत कुऱ्हाडे (२२,रा.साईनगर, नांदुरनाका) हेदोघेही फरार झाले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने याबाबत तपास करत मयत मुलाच्या संशयित माता-पित्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. यानुसार उपनिरिक्षक धैर्यशिल घाडगे, दिलीप शिंदे, दशरथ पागी, सुनील गांगुर्डे आदींनी तपासाला गती देत घटनास्थळी पाहणी करुन पुरावे गोळा केले. घरात मिळालेल्या काही सुगाव्यांवरुन पथकाने कोपरगाव येथून संशयित महिला सुलोचना हिला बेड्या ठोकल्या. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेला तीचा पती संशयित सोमनाथ यास पेठरोडवरील एका वसाहतीतून पोलिसांनी अटक केली. या दोघांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अनैतिक संबंधामध्ये मुलाचा अडसर निर्माण होऊ लागल्याने त्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांविरुध्द खूनाचा गुन्हा व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना रविवारी (दि.२) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
---इन्फो--
माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य
नऊ महिने आपल्या पोटात वाढविणाऱ्या बाळाला जन्म देत तब्बल सात वर्षे सांभाळ करणारी आईच त्याच्या मृत्यूला कारणीभुत ठरली. पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यांतर प्रियकरासोबत राहत असताना अनैतिक संबंधामध्ये पोटच्या मुलाची बाधा येऊ लागल्याचे समजून प्रियकराच्या मदतीने त्या चिमुकल्याचे भींतीवर डोके आपटून ठार मारत माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.