आवई बछड्यांची.. निघाली तरसाची पिल्ले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:45+5:302021-06-16T04:20:45+5:30

शैलेश कर्पे लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : जमिनीची मोजणी सुरू असताना गवतात बिबट्याच्या बछडेसदृश पिल्ले आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांची धावपळ ...

Mother of calves .. Chicks of Tarsali! | आवई बछड्यांची.. निघाली तरसाची पिल्ले!

आवई बछड्यांची.. निघाली तरसाची पिल्ले!

Next

शैलेश कर्पे

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर : जमिनीची मोजणी सुरू असताना गवतात बिबट्याच्या बछडेसदृश पिल्ले आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांची धावपळ उडाली. परिसरात मादी बिबट्याच्या भीतीने सर्वांचीच पाचावर धारण बसली. बिबट्याची बछडे आढळल्याची वार्ता गावभर पसरली. भीतीयुक्त वातावरणात कुतूहलाने पिल्ले पाहण्यासाठी हवश्या-नवश्यांनी भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागील शेताकडे धाव घेतली. वनविभागालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बिबट्याची बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, तीनपैकी तरसाच्या एका पिलाचा भुकेपोटी मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पश्चिम पट्ट्यातील शिवडे शिवारात बिबट्यांचा वावर आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याने दोन वारसांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे दिसून आलेली पिल्ले बछड्यांचीच असावी असा शेतकऱ्यांचा समज झाला होता. शिवडे शिवारात कारभारी लक्ष्मण हारक यांच्या गट कमांक ८३१ मध्ये जमिनीची मोजणी सुरू होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास गवताखाली बछड्यासारखी दिसणारी चार ते पाच दिवसांची तीन पिल्ले आढळून आली. शिवडे परिसरात बछडे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी सहायक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, अनिल साळवे, वनपाल पंडित आगळे, रावसाहेब सदगीर हजर झाले. त्यांनी पाहणी केल्यानंतर ते बिबट्याचे बछडे नसून तरसाची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. यातील तीन पिल्लांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. मादी येऊन तरसाच्या पिल्लांना घेऊन जाईल असा मतप्रवाह असतांना त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याने त्यांना मोहदरी वनउद्यानात डॉक्टरांच्या देखरेखीसाठी उपचाराला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

इन्फो

‘शिवडे शिवारात आढळून आलेली पिल्ले ही बछडे नसून तरसाची आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तीनपैकी एका पिलाचा मृत्यू झाला असून दोन पिल्लांवर उपचाराची गरज आहे. त्यांच्यावर दोन दिवस उपचार केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

- प्रवीण सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर

फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात आढळून आलेली नवजात तरसाची पिल्ले.

Web Title: Mother of calves .. Chicks of Tarsali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.