जन्मदात्यानेच केला मुलाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:24 AM2020-08-30T00:24:43+5:302020-08-30T01:23:10+5:30
सिन्नर : भोजापूर धरणात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाच्या खुनाचा तपास करण्यात वावी पोलिसांना यश आले. अवघ्या चोवीस तासात वावी पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. दारूच्या नशेत आई-वडील यांना मारहाण करीत असल्याने या जाचाला कंटाळून लहान भाऊ आणि वडिलांनीच त्याचा खून करून हातपाय बांधून मृतदेह म्हाळुंगी नदीपात्रात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : भोजापूर धरणात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाच्या खुनाचा तपास करण्यात वावी पोलिसांना यश आले. अवघ्या चोवीस तासात वावी पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. दारूच्या नशेत आई-वडील यांना मारहाण करीत असल्याने या जाचाला कंटाळून लहान भाऊ आणि वडिलांनीच त्याचा खून करून हातपाय बांधून मृतदेह म्हाळुंगी नदीपात्रात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी भोजापूर धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह कुचलेल्या अवस्थेत असल्याने दापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले होते. मृत युवकाच्या खिशात आधारकार्ड व लायसन्स आढळून आल्याने मृतदेहाची ओळख पटली होती. मृत युवकाचे नाव ज्ञानेश्वर माधव सोनवणे असून, तो संगमनेर तालुक्यातील कासार-दुमाला येथील रहिवासी असल्याचे समजल्यानंतर त्यादृष्टीने वावी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. शुक्रवारी मृतदेह आढळून आल्यानंतर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे-वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी (पडिले) यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंंह, अपर पोलीस अधीक्षक घारगे-वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी तपासकामी पथके तयार करून मृत युवकाच्या गावात म्हणजे संगमनेर तालुक्यातील कासार-दुमाला येथे पाठविले होते. सहाय्यक निरीक्षक गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे, विकास काळे यांच्यासह हवालदार उमेश खेडकर, प्रकाश उंबरकर, नवनाथ आडके यांनी कासार दुमाला येथे जाऊन तपास केल्यानंतर मृत युवकाच्या घरी सोमवार (दि. २४) रोजी जोरदार भांडण झाल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. घरात भांडणे झाल्यामुळे पोलिसांची संशयाची सुई मृत युवकाचे वडिल माधव गबाजी सोनवणे (६५) व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे (२७) याच्याभोवती फिरली होती.
मयत ज्ञानेश्वर हा दारू पिऊन आई, वडील, भाऊ यांना मारहाण करण्यासह त्रास देत होता. या जाचाला कंटाळून वडील माधव सोनवणे व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे यांनी त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याला नदीपात्रात फेकून दिले.संशयितांच्या बोलण्यात विसंगती
घरात भांडण झाल्यामुळे पोलिसांची संशयाची सुई मृत युवकाचे वडील माधव गबाजी सोनवणे (६५) व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे (२७) याच्याभोवती फिरली होती. पोलिसांनी वडील व भाऊ यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर दोघांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली.