जायगावच्या ग्रामपंचायतीत सासू-सुनेचा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 08:57 PM2021-01-21T20:57:50+5:302021-01-22T00:37:03+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी यंदा तरुणांना संधी देत त्यांच्यावर गावगाड्याची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये एकाच घरातील सासू-सून यांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केल्याने पंचक्रोशीत तो एक चर्चेचा विषय बनला आहे.
जायगाव येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्र. १मध्ये दोन जनरल जागांसाठी एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात सोमनाथ भगवान गीते, अतुल चंद्रकांत गीते व स्त्री राखीव जागेवर सविता मंगेश गीते हे उमेदवार विजयी झाले. वॉर्ड क्र. २ मधून दत्तात्रय रामचंद्र दिघोळे, तर स्त्री राखीव जागेवर लता रमेश मोहिते व ताईबाई रामा गायकवाड हे विजयी झाले. वॉर्ड क्र. ३मध्ये शालिनी शंकर दौंड व शरद महादू जाधव हे विजयी झाले आहेत. याच वॉर्डात मनीषा संतोष दौंड या बिनविरोध निवडून आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक शांततेत पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सूनबाई बिनविरोध
नऊ सदस्यांच्या निवडीत पहिल्यांदाच एका घरातील दोन सदस्य निवडून आले आहेत. यात सून मनीषा संतोष दौंड बिनविरोध, तर शालिनी शंकर दौंड या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. सासू व सून एकाचवेळी ग्रामपंचायत सदस्य झाल्याने नायगाव खोऱ्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.