बालिका खूनप्रकरणी  संशयावरून आईला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:59 AM2019-07-18T00:59:40+5:302019-07-18T01:01:11+5:30

अवघ्या चौदा महिन्यांच्या तान्हुलीच्या नाजूक गळ्यावर चक्क ब्लेडने वार करून खून केल्याची संतापजनक अन् तितकीच हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

The mother was arrested on suspicion of murder | बालिका खूनप्रकरणी  संशयावरून आईला अटक

बालिका खूनप्रकरणी  संशयावरून आईला अटक

Next

पंचवटी : अवघ्या चौदा महिन्यांच्या तान्हुलीच्या नाजूक गळ्यावर चक्क ब्लेडने वार करून खून केल्याची संतापजनक अन् तितकीच हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनही चक्रावून गेले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची उकल व संशयितापर्यंत पोलीस पोहोचलेले नव्हते, मात्र आडगाव पोलिसांनी स्वरा मुकेश पवार या बालिकेच्या खुनाच्या संशयावरून परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे आई योगीता मुकेश पवार हिला बुधवारी (दि.१७) अटक केली. संशयित आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचता आले असले तरी चिमुकलीच्या खुनाचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
औरंगाबादरोडवर असलेल्या साई पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये दुपारी स्वराचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याची घटना उघडकीस आली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत होती.
घटनेनंतर पोलिसांनी योगीताकडे चौकशी केली असता तिने दुपारी कचरा टाकण्यासाठी जात असताना अज्ञात इसम तोंडाला रूमाल बांधून घरात चाकू घेऊन शिरला. त्याने दागिन्यांची मागणी करत माझ्यासह स्वरावर वार केले व तो पळून गेल्याचे सांगितले.
मात्र पोलिसांनी याबाबत सर्व शक्यता पडताळून धागेदोरे जुळवत घटनास्थळी आढळून आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यानुसार पडताळणी करून स्वराचा खून झाला तेव्हा घरात योगीताच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते, या निष्कर्षावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केले. योगीता चोरीचा बनावट प्रसंग सांगत असल्याची पोलिसांची खात्री झाली आणि पोलिसांनी दुपारी योगीताला बेड्या ठोकल्या.
बालिकेच्या खुनाचा उलगडा करत असताना बालिकेच्या आईने वेगवेगळी कारणे सांगून पोलिसांची दिशाभूल करत खुनी मी नव्हेच, अशी भूमिका घेतल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले होते. घटनेनंतर तत्काळ उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखा युनिट-१चे पथक, श्वान पथक, वैज्ञानिक न्याय सहायक पथक दाखल झाले होते. ज्या फ्लॅटमध्ये स्वराचा खून झाला तेथून नेलकटर, धारदार ब्लेड, तत्सम वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. संशयित योगीता बनाव करत असल्याची खात्री पोलिसांना बुधवारी दुपारी पटली. अखेर पोलिसांनी स्वराच्या आईला खुनाच्या संशयावरून बेड्या ठोकल्या.

Web Title: The mother was arrested on suspicion of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.