रणरणत्या उन्हातील ‘मातृरूप दर्शन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:39 PM2020-05-09T22:39:25+5:302020-05-10T00:46:47+5:30
नाशिक : डोक्यावर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सामानाचं गाठोडं अन्् हाताच्या पाळण्यात धरलेला इवलासा जीव. एकीकडे हातातील आपल्या इवल्याशा जिवाला जिवापल्याड सांभाळण्याची जीवघेणी कसरत, तर दुसरीकडे अंगाची लाही करणाऱ्या तळपत्या उन्हातील शेकडो मैलांची पायपीट करणा-या अनेक माता महामार्गावरून चालत जातानाचे दृश्य हृदयाला पिळवटून टाकणारे.
धनंजय रिसोडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : डोक्यावर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सामानाचं गाठोडं अन्् हाताच्या पाळण्यात धरलेला इवलासा जीव. एकीकडे हातातील आपल्या इवल्याशा जिवाला जिवापल्याड सांभाळण्याची जीवघेणी कसरत, तर दुसरीकडे अंगाची लाही करणाऱ्या तळपत्या उन्हातील शेकडो मैलांची पायपीट करणा-या अनेक माता महामार्गावरून चालत जातानाचे दृश्य हृदयाला पिळवटून टाकणारे.
कोरोनाच्या विळख्यातील समाजाचे सर्वाधिक विदारक चित्र सध्या महामार्गांवर अनुभवायला मिळत आहे. कुणाचे बाळ दीड वर्षाचे, कुणाचे दोन वर्षांचे, कुणाचे सहा महिन्यांचे तर एका महिलेचे बाळ तर अवघे आठवड्याचे. अक्षरश: ओली बाळंतीणदेखील आपल्या तान्हुल्याचा जीव जगविण्यासाठी रणरणत्या उन्हात डोक्यासह सर्वांगाला पोळणारे चटके सहन करीत शेकडो मैल चालत आपापल्या कुटुंबांसह गावी निघाल्या आहेत.
थेट विल्होळी नाक्यापासून ते ओझरपर्यंतच्या रस्त्यावर कोणत्याही वेळी किमान काही माता आपापल्या बालकांना घेऊन गावी निघाल्याचे दिसून येत आहे.
अवघे आठवड्याचे बाळ हातात घेऊन एक माता पायी मध्य प्रदेशकडे निघाली होती, तर दोन वर्षांचे बालक एका कंबरेवर घेऊन दुसरी माता थेट त्यापेक्षाही मोठा पल्ला गाठण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशकडे कुटुंबीयांसह निघाली होती. काही माता एकमेकींना भावनिक मदतीचा सहारा देत पुढे-पुढे मार्गक्रमण करीत होत्या. रणरणत्या उन्हातील हे मातृरूप दर्शन पाहणाºया प्रत्येकाला कोरोनाच्या विळख्यातील समाजाचे सर्वाधिक करूण दृश्य होते. काही कुटुंबांकडे तर जेवणासाठी लागणारे डाळ, तांदूळदेखील पुढील दोन दिवसांपुरतेच होते. पुढे कुठे तरी वाटप होईल, तिथे जमेल तसे पोटभरू पण घरी पोहोचू हा त्या कुटुंबांचा निर्धार अद्वितीय होता.
---------
ठेकेदारांनी केली नाही मदत
गावाकडे परतणा-या या कुटुंबांपैकी बहुतांश जणांना त्यांच्या ठेकेदारांनी अडचणीच्या या प्रसंगात साथ दिली नाही. घरी परतण्यासाठी थोडेफार पैसेदेखील उधार दिले नाहीत. त्यामुळे प्रती माणशी दोन-तीन हजार रुपये खर्चून गावी जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसल्याने पायी किंवा सायकलवर कुटुंबाला घेऊन मार्गक्रमण करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाले.