आधार नोंदणीसाठी माता-बालकांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:14 PM2019-06-27T18:14:00+5:302019-06-27T18:14:33+5:30
राज्य सरकारने ग्रामीण भागातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गावातील प्रत्येक अंगणवाडीमार्फत गहू, तेल, मटकी, मीरची, हळद, मीठ, मसूर डाळीचे मोफत वाटप गरोदर स्तनदा महिला व तीन वर्षांच्या बालकांना देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी बालकांचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.
नाशिक : शासनाने अंगणवाडीत गरोदर व स्तनदा महिला तसेच तीन वर्षांच्या बालकांना पोषण आहाराचा शिधा देण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी मात्र बालकांचे आधार कार्डाची सक्ती केल्यामुळे अशा बालकांचे आधार कार्ड काढण्यासाठी महिलांना लहान बालकांना घेऊन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल व अन्य भागांत कोठेही आधार केंद्राची सोय नसल्याने तेथील महिला व बालकांची गिरणारे व मखमलाबाद येथील आधार केंद्रांवर गेल्या काही दिवसांपासून गर्दी होवू लागली आहे.
राज्य सरकारने ग्रामीण भागातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गावातील प्रत्येक अंगणवाडीमार्फत गहू, तेल, मटकी, मीरची, हळद, मीठ, मसूर डाळीचे मोफत वाटप गरोदर स्तनदा महिला व तीन वर्षांच्या बालकांना देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी बालकांचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आधार कार्डची सोय नसल्याने बहुतांशी आदिवासी महिला व बालकांकडे आधार नोंदणी नाही. शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज असली तरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात आधार केंद्रेच नसल्याने गेल्या काही दिवसांपासून येथील आदिवासी महिला व बालकांचे लोंढेच्या लोंढे मखमलाबाद, गिरणारे तसेच लगतच्या भागात आधार केंद्रांचा शोधासाठी वणवण भटकत आहेत. त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथील महिलांची मखमलाबाद येथील आधार केंद्रावर सकाळपासून मोठी रांग लागत असून, त्यासाठी त्यांना रोजगार बुडवावा लागत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल, देवडोंगरा आदी भागांतील महिला दररोज पहाटेच आधार केंद्राच्या बाहेर बालकांना घेऊन नंबर लावत आहेत. दिवसभर उभे राहूनही आधार कार्ड नोंदणी होत नसून, अनेकांना दोन-तीन दिवसांपासून फेऱ्या माराव्या लागल्याचे सांगण्यात आले.