मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:52 PM2018-10-26T16:52:58+5:302018-10-26T16:53:10+5:30

१३ मोटारसायकली जप्त : बनावट नंबर प्लेट लावून विक्रीचा धंदा

Motorcycling stolen racket exposed | मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस

मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस

Next
ठळक मुद्देसंशयित गोरख कदम, वाल्मिक पिंपरकर व रविंद्र बेलेकर हे तिघेजण नुकतेच नांदगाव पोलिस ठाण्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटले होते.

नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोटार सायकल चोरीचे रॅकेट उघडकीस आणले असून ५ सराईत गुन्हेगारांना गजाआड करत त्यांच्याकडून १३ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. चोरीच्या मोटारसायकली या कमी किंमतीत बनावट नंबर प्लेट लावून विक्री केल्या जात होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून येवला व मनमाड परिसरात गस्त सुरु असताना मनमाड शहरातील काही संशयित बनावट नंबर प्लेट लावून मोटार सायकल वापरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मनमाड शहरातून सराईत गुन्हेगार गणेश राजेंद्र खैरनार (वय २७, रा.निंबाळकर चाळ, मनमाड), राजू रमेश सपकाळ (वय २३, रा. विवेकानंदनगर, मनमाड), अमोल पोपट वाघ (वय २५, रा. विवेकानंदनगर, मनमाड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बनावट नंबरप्लेट असलेली स्प्लेंडर प्लस मोटार सायकल जप्त करण्यात आली. सदर मोटारसायकल ही येवला शहरातून चोरी केल्याची कबुली संबंधित संशयितांनी दिली. पोलिसांनी पुढील तपास करत संशयितांचे साथीदार गोरख पुंडलीक कदम (वय २२, सोमठाण देश, येवला), वाल्मिक भाऊसाहेब पिंपरकर (वय २८, सोमठाण देश) आणि रविंद्र उर्फ भैय्या वसंत बेलेकर (रा. विंचुरकरवाडा, विंचूर) यांनी परिसरातून मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी गोरख कदम आणि वाल्मिक पिंपरकर यांना ताब्यात घेतले तर रविंद्र बेलेकरचा शोध सुरू आहे. संशयित गोरख कदम, वाल्मिक पिंपरकर व रविंद्र बेलेकर हे तिघेजण नुकतेच नांदगाव पोलिस ठाण्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटले होते. त्यानंतरही त्यांनी मनमाड येथील साथीदारांसह गॅँग तयार करून पुन्हा मोटार सायकल चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. चोरी केलेल्या मोटार सायकली बनावट नंबरप्लेट व बनावट कागदपत्र तयार करुन मिळेल त्या किंमतीत विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयितांनी लपवून ठेवलेल्या एकूण १३ मोटारसायकली काढून दिल्या आहेत.
 

Web Title: Motorcycling stolen racket exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.