विहिरीतून निघाल्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:51 AM2018-06-20T00:51:34+5:302018-06-20T00:51:34+5:30
सिडको : पूर्वीच्या काळी घरातील सोने, पैसे अडके हे चोरांच्या भीतीपोटी घरातील एखाद्या कोपऱ्यात वा घराबाहेर जमिनीत पुरून ठेवले जात असत़ हीच पद्धत आता चोरट्यांनीही आत्मसात केली असून, त्यांनी जमिनीऐवजी विहिरीचा सहारा घेतल्याचे मंगळवारी अंबड येथील घटनेवरून समोर आले़
सिडको : पूर्वीच्या काळी घरातील सोने, पैसे अडके हे चोरांच्या भीतीपोटी घरातील एखाद्या कोपऱ्यात वा घराबाहेर जमिनीत पुरून ठेवले जात असत़ हीच पद्धत आता चोरट्यांनीही आत्मसात केली असून, त्यांनी जमिनीऐवजी विहिरीचा सहारा घेतल्याचे मंगळवारी अंबड येथील घटनेवरून समोर आले़
वाहन चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित नवनाथ उर्फ डॉलर रामदास साळवे याने दोन साथीदारांसह शहरातून चोरी केलेल्या तीन दुचाकी व तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून चोरलेले पार्ट या विहिरीत फेकून दिले होते़ पोलिसांनी त्याच्याकडून दहा दुचाकी व घरफोडीतील कंपनीचा मुद्देमाल, असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे सुटे भाग चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती़ पोलिसांनी या चोरीप्रकरणी प्रमुख संशयितास अटक केल्यानंतर त्याचे साथीदार संशयित नवनाथ उर्फ डॉलर साळवे व अन्य दोघांनी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील व आपल्याकडी चोरीच्या दुचाकी त्यांच्या हाती लागतील व आपला जेलची हवा खावी लागेल या भीतीपोटी अंबड खालचे चुंचाळे येथील पाणी असलेल्या एका विहिरीत तीन-चार दुचाकी फेकून दिल्या़ तसेच कंपनीतून चोरी केलेला मालही या विहिरीत टाकला़
अंबड पोलिसांनी नवनाथ उर्फ डॉलर व त्याचे दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकी विहिरीत टाकल्याची माहिती
दिली़ त्यानुसार पोलिसांनी
मंगळवारी दिवसभर दोन वेळा विहिरीतील पूर्ण पाणी मोटरच्या साहाय्याने उपसले व क्रेनने तीन दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या़
या संशयितांकडून चोरीच्या एकूण दहा दुचाकी आढळून आल्या असून, त्या सातपूर, मुंबई नाका, इंदिरानगर, अंबड या ठिकाणाहून चोरण्यात आलेल्या आहेत़ दरम्यान, एक संशयित
फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे़
पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस हवालदार मल्ले, पोलीस नाईक दत्तात्रय गवारे, दुष्यंत जोपळे, विजय वरंदळ, अविनाश देवरे, हेमंत अहेर, दीपक वाणी, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, विपूल गायकवाड मनोहर कोळी, प्रशांत नागरे यांनी ही कारवाई केली़
दरम्यान, या विहिरीतील दोन वेळा पाणी उपसण्यात आले़ मात्र विहीर खोल व गाळ खूप खोल असल्याने यामध्ये माणूस उतरविणे जोखमीचे असल्याने क्रेनच्या साहाय्याने दुचाकी विहिरीबाहेर काढण्यात आल्या़
दुचाकी चोरीतील पहिल्या संशयितास अटक केल्यानंतर दुसºया संशयितांचे अटकसत्र सुरू झाल्याने या संशयितांना चोरी गेलेल्या दुचाकी लपविण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही़ पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले व आपल्याकडे मुद्देमाल सापडला की आपला जेलमधील आणखी वाढेल या भीतीपोटी त्यांनी आपल्याकडील दुचाकी विहिरीत टाकण्याचा सपाटा लावला़ तीन-चार दुचाकी टाकल्याही, मात्र दुसºया दिवशी या संशयितांना अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आला़ यातून आणखी काही दुचाकी चोºया उघडकीस येतील़
- सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे़