बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन ; आयुक्तांचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 03:18 PM2017-07-25T15:18:13+5:302017-07-25T15:18:13+5:30
आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
नाशिक : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. महापालिका आयुक्तांचे समर्थन करतानाच बच्चू कडू यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सोमवारी (दि.२४) आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेतली असता, त्यावेळी कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर बच्चू कडू यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. आयुक्तांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२५) महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र जमत प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘बच्चू कडू हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या. बच्चू कडू यांच्यावर कठोर कारवाईचीही मागणी करण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे, भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी यावेळी भाषणे करत या साऱ्या प्रकरणात आयुक्तांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शिवाय, बच्चू कडू यांची कृती निषेधार्ह असल्याचे सांगत कारवाईची मागणी करण्यात आली.