महापालिकेच्या करवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:16 AM2018-02-25T01:16:55+5:302018-02-25T01:16:55+5:30
महापालिकेच्या प्रस्ताविक घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात महाराष्टÑ नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, शनिवारी (दि.२४) सावतानगर, सिडको येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या झेरॉक्स बिलांची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
सिडको : महापालिकेच्या प्रस्ताविक घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात महाराष्टÑ नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, शनिवारी (दि.२४) सावतानगर, सिडको येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या झेरॉक्स बिलांची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याची तयारी सुरू केली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या करवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अनिल मटाले, विभाग अध्यक्ष रामदास दातीर, सरचिटणीस अॅड. अतुल सानप, महिला आघाडीच्या कामिनी दोंदे यांच्या नेतृत्वाखाली सावतानगर येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांची होळी करण्यात आली. सत्ताधारी पक्षाकडून सर्वसामान्य नाशिककर, कष्टकरी कामगार व स्वयंरोजगारी करणारे, चाकरमाने अशा सर्वांवरच अन्यायकारक करवाढ केली असून, नागरिकांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केलेल्या करवाढीमुळे शहरासह सिडको भागातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून याबाबत मनपाने विचार करून दरवाढ माघे घ्यावी अन्यथा यापुढील काळात नागरिकांच्या प्रश्नासाठी मनसे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत मनसेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी गणेश मोरे, बाजीराव दातीर, संजय दातीर, अरुण दातीर, प्रणव मानकर, सुधाकर टाव्हरे, विशाल फडोळ, प्रशांत ठाकरे, धीरज भोसले, अरुणा पाटील, धनश्री ढोले आदी सहभागी झाले होते.
मनपाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी भरमसाठ करवाढ केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मनपाने करवाढीबाबत विचार करून ती त्वरित मागे घ्यावी, अन्यथा यापुढील काळात मनसे नागरिकांच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेत मनपा प्रशासनाच्या विरोधात मनसे स्टाइल आंदोलन छेडणार.
- अनिल मटाले, शहराध्यक्ष, मनसे