छात्रभारतीने भरविली रस्त्यावर शाळा, शिक्षण विभागाच्या 1300 शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:33 PM2017-12-18T15:33:38+5:302017-12-18T15:47:27+5:30
कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल 1314 शाळा बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शासकीय शाळा बंद करून शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सोमवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यासमोरील जून्या आग्रा महामार्गावर बसून रस्त्यातच शाळा भरविली.
नाशिक : शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने, कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल 1314 शाळा बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शासकीय शाळा बंद करून शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सोमवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यासमोरील जून्या आग्रा महामार्गावर बसून रस्त्यातच शाळा भरवून सरकारचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नजीकच्या अन्य सरकारी वा खासगी शाळेत सामावून घेण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून, राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग करणारा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त करीत छात्रभारती संघटनेने आंदोलनात्मक पवित्र घेतला आहे. संघटनेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जूना मुंबई आग्रा महामार्गावर बसून शाळा भरवित आंदोलन करताना सरकारविरोधी घोषणाबाजी केली. तसेच छात्र भारतीने सरकार विरोधी भूमिका घेतल्याने छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही छात्रभारतीवर केला आहे. छात्रभारतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गरीब व सर्वसामान्यांच्या विरोधातील शैक्षणिक धोरण राबविण्याचा आरोप केला असून, सरकारने राज्यातील 1314 शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच परीक्षांसदर्भात परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याच्या निर्णयाचाही पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. या आंदोलनात छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, शहराध्यक्ष समाधान पवार, राहूल सूर्यवंशी, दीपक बोरसे, मुन्ना पवार, गोरख कुंदे, सदाशिव गणगे, निवृत्ती खेताडे, वैभव थेरे, अमृता शिंदे, मयुर वाघ, ईशा माळी आदिंनी सहभागी होत सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. शिक्षण विभागाने घेतलेल्या 1314 शाळा बंद करण्याच्या विरोधात छात्रभारती विद्याथी संघटनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडून छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांना धमकावले जात आहे. सरकार विरोधातील आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप छात्रभारतीने यावेळी अभाविप विरोधातही निषेध नोंदवला.