कळवणला सकल मराठा समाजाचा मोर्चा, चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:24 PM2018-08-09T17:24:41+5:302018-08-09T17:25:26+5:30
आरक्षणसह विविध मागण्या : शिस्तबद्धतेचे दर्शन, संपूर्ण व्यवहार बंद
कळवण- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाचा झंझावात कळवणमध्ये गुरु वारी (दि.९) दिसून आला. मराठा समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने कळवणच्या रस्त्यावर उतरु न सरकारचे लक्ष वेधून घेतले तर मागण्या मान्य केल्या नाहीत तर एल्गार पुकारण्याचा इशाराही समाजाच्या युवतींनी चक्का जाम आंदोलनप्रसंगी दिला.
स्वंयशिस्तीचा आदर्श ठरणारा हा मोर्चा कळवण न्यायालयापासून निघाला. घोषणाबाजी करत मोर्चा गणेशनगर, नगरपंचायत, सुभाषपेठ, फुलाबाई चौकातून अंबिका चौक मार्गे मेनरोडवरु न एसटी बस स्थानकावर आला. याठिकाणी ठिय्या मांडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी नेहा पाटील,शरण्या गांगुर्डे, सानिया पगार, साक्षी सोनवणे ,प्रांजली वाघ,श्रावणी वाघ,ऋतिका शिंदे,अदिती निकुंभ, पलक बच्छाव,ममता जाधव यांनी समाजाच्या मागण्या मांडल्या. मोर्चेकऱ्यांनी वापरलेली ‘आम्ही मराठा’असे लिहिलेली गांधी टोपी लक्ष वेधून घेत होती. मोर्चात प्रथमस्थानी महिला व विद्यार्थिनी तर शेवटच्या स्थानावर राजकीय नेते होते. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवत समाजासाठी एकी दाखवली. मोर्चा संपताच परतीच्या वाटेवर असलेल्या मराठ्यांनी स्वयंशिस्त दाखवत, कचरा, प्लॅस्टिक पिशव्या उचलून घेतल्या. सूत्रसंचालन दीपक हिरे यांनी केले. तर प्रदीप पगार यांनी आभार मानले. त्यानंतर आंदोलनस्थळी तहसीलदार कैलास चावडे ,पोलीस निरीक्षक एस.जी.मांडवकर यांना युवतींनी निवेदन दिले.
पाऊस अन् कडकडीत बंद
मराठा आरक्षण संदर्भात चक्का जाम आंदोलन पाशर््वभूमीवर बुधवारी (दि.८) रात्री व गुरु वारी सकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. परंतु, पावसाने सकाळी विश्रांती घेतल्याने मोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले. पुकारण्यात आलेल्या चक्का जाम मुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कळवण आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही.
नगरपंचायत करणार ठराव
मराठा आरक्षण चक्का जाम आंदोलनात नगरपंचायतच्या नगरसेवकांनी सहभागी होऊन मागण्यांना पाठींबा दिला. नगरपंचायतच्या बैठकीत मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे या मागणीचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मागासवर्गीय आयोग यांना पाठविणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली.