संगणक परिचालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 02:36 PM2019-08-28T14:36:42+5:302019-08-28T14:53:28+5:30
घोटी : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परीचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, २०१७ पासून थकलेले मानधन तात्काळ द्यावे आदी महत्वपूर्ण मागण्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील संगणक परीचालकांनी आज धरणे आंदोलन केले.
घोटी : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परीचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, २०१७ पासून थकलेले मानधन तात्काळ द्यावे आदी महत्वपूर्ण मागण्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील संगणक परीचालकांनी आज धरणे आंदोलन केले. इगतपुरी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी विविध घोषणा देऊन शासनाकडे निषेध नोंदवण्यात आला. संगणक परिचालक संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष अंकुश राव यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, विस्तार अधिकारी संजय पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांवर सकारात्मक विचार करून शासन आणि वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदन पाठवण्यात येणार आहे.
तालुकाध्यक्ष अंकुश राव म्हणाले की, महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या प्रमुख मागणीसह अजून काही मागण्यांसाठी १९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे संगणक परीचालकांचे कुटुंब उपासमार सहन करीत आहे. २०१७ पासूनचे मानधन थकीत असल्याने अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. अनेक कामांचे मानधन वाढवण्याबाबतही निर्णय प्रलंबित आहे. त्यानुसार आज इगतपुरी पंचायत समतिी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी संगणक परिचालकांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचा शब्द त्यांना दिला. तालुकाध्यक्ष अंकुश राव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या महिला उपाध्यक्ष श्रध्दा शिंदे, जिल्हा पदाधिकारी गणेश पोरजे, अशोक भारती, सायली शिंदे, मनिषा पोरजे, प्रभाकर गोहीरे, भगवान आवारी, अनिता बर्वे, सोमनाथ भोर, हिरामण गायकर, रामचंद्र म्हसणे, गजानन भगत, संदेश कदम, सागर इचम आदींनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.