रेल्वेस्थानकातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:07 AM2018-08-18T01:07:54+5:302018-08-18T01:08:32+5:30

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील कंत्राटी सफाई कामगारांनी पूर्ण पगार मिळावा व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी काही काळ कामबंद आंदोलन केले.

Movement of contract workers in the railway station | रेल्वेस्थानकातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन

रेल्वेस्थानकातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन

Next

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकातील कंत्राटी सफाई कामगारांनी पूर्ण पगार मिळावा व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी काही काळ कामबंद आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन भुसावळच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानी संबंधित सफाईचा ठेका घेतलेल्या पहल कंपनीच्या मुख्यालयाशी संपर्क साधून कंत्राटी कामगारांचा पगार व त्यांच्या इतर समस्या सोडविण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नाशिकरोड रेल्वेस्थानकात पहल या दिल्लीच्या कंपनीने साडेपाच कोटी रुपयाला स्वच्छतेचा ठेका घेतला आहे. रेल्वेने स्वच्छता विभागाचे आठ कर्मचारी अन्य विभागात सामावून घेतले होते. पहल कंपनीने सहा महिन्यांपूर्वी ६५ कामगार कंत्राटी पद्धतीने रेल्वेस्थानकावर स्वच्छतेच्या कामासाठी भरती केली होती. भरतीच्या वेळेला या कामगारांना आठ तास काम आणि दरमहा तेरा हजार रुपये वेतन देण्याचे रेल्वे प्रशासनासमोर ठेकेदाराने मान्य केले होते; मात्र अनेक कामगारांना निम्माच पगार ठेकेदार देत आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला म्हणून ठेकेदाराने दोन कामगारांना दोन दिवसांपूर्वी काढून टाकले होते. पगाराची आतापर्यंतची पूर्ण रक्कम मिळावी, कामावरून काढलेल्या कामगारांना थकीत रक्कम मिळावी, ठेका रद्द करावा, भ्रष्ट अधिकाºयांनी व अन्य गैरप्रकारांची चौकशी करावी, पगारी साप्ताहिक व आजारपणाची सुटी मिळावी आदी मागण्यांसाठी ठेकेदाराच्या कंत्राटी कामगारांनी गुरुवारी व शुक्रवारी रेल्वेस्थानकावर काही काळ आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती भुसावळ रेल्वे विभागाला मिळताच भुसावळचे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक सुनील कुमार मिश्रा यांनी पहल संस्थेच्या मुख्यालयाशी संपर्क साधून कामगारांना ठरलेले वेतन देण्याची सूचना केली.
नाशिकरोड रेल्वे स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार, मुख्य आरोग्य निरीक्षक के. सी. गुप्ता, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा व स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समवेत शुक्रवारी दुपारी बैठक घेण्यात आली. यावेळी स्टेशन प्रबंधक आर.के. कुठार यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला स्वच्छतेचे कोणते काम, कोठे व कधी होईल याचे वेळापत्रक लावण्याचे आदेश दिले. सफाई कामगारांची संख्या, त्यांचा पगार किती, तो अदा करण्याची तारीख, कोणत्या बॅँकेमार्फत पगार होणार, कामगार अधिकारी कोण, त्यांचा मोबाइल क्रमांक या सर्वांची माहिती असणारा फलक ठेकेदाराने आपल्या कार्यालयात लावावा अशी सूचना करण्यात आली.

Web Title: Movement of contract workers in the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.