नर्सेस संघटनेचे मागण्यांसाठी आंदोलन
By Admin | Published: June 24, 2017 12:04 AM2017-06-24T00:04:36+5:302017-06-24T00:09:36+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आरोग्यसेविका व आरोग्य सहायिका यांना कालबद्ध पदोन्नती देण्याच्या प्रमुख मागणीसह एकूण नऊ प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्यसेविका, आरोग्य सहायिका यांचे १२ वर्षे कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव तत्काळ मंजूर करावेत, आरोग्यसेविका, आरोग्य सहायिका यांना २४ वर्षे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा, एकूण १६ आरोग्यसेविका यांना पदोन्नतीने आरोग्य सहायिका या पदावर तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, एकूण चार आरोग्य सहायिका यांना पदोन्नतीने विस्तार अधिकारी (आरोग्य) या पदावर तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, एन.एच.एम.अंतर्गत काम करत असलेल्या नर्सेस भगिनींचे वेतन वेळेवर करावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शोभा खैरनार, प्रमिला मेदडे, मंगला धुर्जंड, विमल घोडके, सरला शहाणे, बेबीताई काटे, मंगला कणसे आदी सहभागी झाले होते.