सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात शेतकरी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:16 PM2017-10-16T16:16:52+5:302017-10-16T16:17:01+5:30
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच कारवाईत अटक केल्यानंतर त्यातील एका अधिकाºयाचे थेट सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (दि.१६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकार लाचखोर अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध नोंदवला.
सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत सापडला आहे. लाचखोरीत अटक झालेल्या अधिकाºयांना वाचविण्यासाठी जोरदार राजकीय प्रयत्न सुरू आहेत. तीन लाख रुपयांची लाच घेताना पकडलेले कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिलीप राऊत यांचे जावई असून, महापौर रंजना भानसी यांचे भाचेजावई आहेत. दिलीप राऊत हे दिवंगत माजी खासदार कचरूभाऊ राऊत यांचे पुत्र आहेत. पवार यांची काही महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंतापदी नाशिकला बदली झाली व ही बदली शहरातील एका आमदारांच्या कृपेनेच झाल्याची चर्चा असल्याने या अभियंत्यांना वाचविण्यासाठी राजकीय ताकद लावली जात असल्याचा आरोप करताना राजकीय दबावामुळेच या लाचखोर अधिकाºयांवर कारवाई करण्यात कुचराई होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद पगार यांनी सांगितले. तसेच सरकारने लाचखोर अधिकाºयांवर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मंत्रालयात घुसून आंदोलन करील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.