गोदेच्या सन्मानासाठी चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:04 AM2017-08-19T01:04:52+5:302017-08-19T01:05:00+5:30
नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
नाशिक : नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
देशभरातील प्रमुख मोठ्या नद्यांना सन्मान देऊन निर्मळ करण्यासाठी राष्टÑीय स्तरावर उपक्रम राबविण्यात येत आहे. नमामि गंगा, नमामि नर्मदा हा त्यातीलच एक भाग होय. परंतु गोदावरीसाठी शासनाऐवजी समाजातून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सजग समाजाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच चळवळ उभी करण्यात येणार आहे. गोदावरीप्रेमी म्हणून यापूर्वीही उपक्रम राबविणारे राजेश पंडित तसेच अभिनेते चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, मिलिंद दंडे, अॅड. शिरीष दंदणे व डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी एकत्र येऊन नमामि गोदा फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १९) दुपारी तीन वाजता उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या प्रेरणेतूनच ही चळवळ उभी राहत असल्याने त्यांच्या हस्तेच नमामि गोदाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. फाउंडेशनने भावी पिढी असलेल्या शाळा, महाविद्यालयातील मुलांना या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी तीस शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून त्यांना गोदावरी संदर्भात विविध स्पर्धा आणि अन्य प्रकल्प सादर करण्याचा उपक्रम राबविण्याची संधी दिली होती. त्या माध्यमातून गोदावरी चळवळीत योगदान देऊ इच्छिणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा पाचशे जणांना गोदावरी रक्षक आणि गोदावरी सेवक या रचनेत सामावून घेतले जाणार आहे. त्याची घोषणादेखील याच कार्यक्रमात करण्यात येईल. यानंतर रविवारी दुपारी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी येथून गोदावरीची वारी सुरू करण्यात येणार आहे. वारी ही सेवा धर्म म्हणून केली जाते. गोदावरीची सेवा करण्याचे कार्य नागरिकांमधून आणि विशेषत: गोदावरी नदीकाठी असलेली गावे आणि शहरातील नागरिकांकडून व्हावे यादृष्टीने त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २०) त्र्यंबकेश्वर येथे मोहिमेचा शुभारंभ होईल आणि सोमवारी सायंकाळी पाच वाजता रामकुंडावर समारोप होणार आहे, अशी माहिती राजेश पंडित यांनी दिली.