आंदोलन : जवखेडे दलित हत्त्याकांडाच्या निषेधार्थमनमाड शहरात मोर्चा व धरणे
By admin | Published: October 31, 2014 10:51 PM2014-10-31T22:51:22+5:302014-10-31T22:56:05+5:30
आंदोलन : जवखेडे दलित हत्त्याकांडाच्या निषेधार्थमनमाड शहरात मोर्चा व धरणे
मनमाड : नगर जिल्ह्यातील जवखेडे येथे झालेल्या दलित तिहेरी हत्त्याकांडाच्या निषेधार्थ मनमाड येथे समस्त भीमसैनिकांनी निषेध मोर्चा काढून धरणेआंदोलन केले.
सोसायटीपासून निघालेल्या मोर्चात अनेक नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. शहराच्या मुख्यरस्त्यावरून निघालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचल्यानंतर या ठिकाणी धरणेआंदोलन करण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या हत्त्याकांडाबद्दल अनेक मान्यवरांनी तीव्र शब्दात निषेध केला. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, राजाभाऊ अहिरे, नगराध्यक्ष योगेश पाटील, दिनकर धिवर, दिलीप नरवडे, गंगाभाऊ त्रिभुवन, कैलास अहिरे, प्रवीण पगारे, पी.आर.निळे, रवींद्र गायकवाड, विलास कटारे, संतोष अहिरे, संजय निकम, योगेश निकाळे, सचिन शिरूड, बी.एस. बनकर, यशवंत बागुल आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
येथील फुले शाहू आंबेडकर मुलनिवासी मुस्लिम विचार मंचच्या वतीने जवखेडा येथील दलित हत्त्याकांड घटनेचा निषेध करणारे निवेदन मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्यात दलितांवर अन्याय होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
सोनाईनंतर जवखेडे येथे घडलेली तसेच पुणे येथील निर्दोष मोहसीन शेख हत्त्या प्रकरण या घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या आहे. या घटनांचा मंचच्या वतीने निषेध करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी मंचचे अध्यक्ष अहमद बेग मिर्झा, सचिव फिरोज शेख, गंगाभाऊ त्रिभुवन, विलास अहिरे, मयूर बोरसे, शरद बहोत आदि सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)