शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रंथालय सेवकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:19 AM2018-09-20T00:19:20+5:302018-09-20T00:19:53+5:30
वेतनवाढीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
नाशिक : वेतनवाढीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
ग्रंथालय कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी धरणे आंदोलन करण्यात आले असून, त्यात प्रामुख्याने सन २०१२ मधील बाकी असलेले ५० टक्के परीरक्षण अनुदान वाढ करावी, कर्मचाºयांना किमान वेतनापेक्षाही कमी पगार मिळतो, त्यामुळे कर्मचाºयांच्या वेतनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी, शासकीय नियमानुसार सेवाशर्ती आणि वेतनश्रेणी देण्यात यावी, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी २०१२ पासून बंद करण्यात आलेली वर्ग वाढ व नवीन शासनमान्यता देण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर दिवसभर धरणे धरून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश शिरसाठ, रामचंद्र काकड, दत्ता पगार, बाबासाहेब कोल्हे, विनोद खैरनार, बाबासाहेब थेटे, लक्ष्मण धोत्रे, शांताराम जाधव, बाळासाहेब खालकर, रावसाहेब वाळके, राहुल गुंजाळ, स्वप्निल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रंथमित्र सहभागी झाले होते.