सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:19 PM2018-09-28T17:19:01+5:302018-09-28T17:21:44+5:30
सिन्नर येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या शासकीय योजना राबविण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव, बबनराव जगताप यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार हे २०१६ पासून सिन्नर येथे कार्यरत आहे. पगार हे तालुक्यातील मागासवर्गीय सरपंच असलेल्या ग्रामपंचायतींना भेटी देवून सरपंचांना त्रास देतात, तसेच चुकीचे काम करण्यात भाग पाडतात, सदस्यांना चुकीची वागणूक देतात, पंचायत समिती मासिक सभेत अनुसुचित जाती जमातींच्या विषयांची इतिवृत्तात नोंद घेत नाही असे आरोप आंदोलनकर्त्यांनी केले. पगार यांच्या काळात अनुसुचित जातीच्या वस्तीत झालेली कामे ही निकृष्ठ असून बहुतेक कामे ही अपूर्ण ठेवण्यात आली. दलित वस्ती योजनेतील बहुतेक कामे अन्य ठिकाणीच केली, रमाई व शबरी आवास योजनेतील लाभार्थ्यांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नाही यासह विविध आरोप करण्यात आले. पगार यांना तत्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे यांनी देण्यात आली आहे. धरणे आंदोलनास छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, पंचायत समिती सदस्य तातू जगताप, कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, शिवसेना सिन्नर विधानसभा प्रमुख बाळासाहेब सानप, वडगाव सिन्नरचे सरपंच सुनिता आढाव, भारीप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, प्रविण रणशेवरे, समाधान पठारे, वसंत लोहकरे यांनी भेट दिली.