नाइन वन जनता संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:20 AM2020-01-02T00:20:52+5:302020-01-02T00:21:41+5:30
मालेगाव मध्य : मनपा वॉर्ड क्रमांक २० येथील लेबर पार्कवरील अनधिकृत झोपड्याचे अतिक्रमण काढण्यात यावे व शहरातील स्वच्छतेसाठी नाइन वन जनता संघटनेतर्फे बुधवारी दुपारी १ वाजता ६० फुटी रस्त्यावर संविधानाच्या प्रतिमेचा मुकुट लावत अभिनव आंदोलन छेडण्यात आले.
मालेगाव मध्य : मनपा वॉर्ड क्रमांक २० येथील लेबर पार्कवरील अनधिकृत झोपड्याचे अतिक्रमण काढण्यात यावे व शहरातील स्वच्छतेसाठी नाइन वन जनता संघटनेतर्फे बुधवारी दुपारी १ वाजता ६० फुटी रस्त्यावर संविधानाच्या प्रतिमेचा मुकुट लावत अभिनव आंदोलन छेडण्यात आले.
महात्मा गांधीजींच्या वेशभूषेत अख्तर हुसैन रस्त्यावर बसल्याने त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पवारवाडी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
प्रभाग क्रमांक २० मधील सर्व्हे क्रमांक १९२/१ येथे मोकळ्या जागेवर अनधिकृत झोपडीधारकांनी रस्ताच गिळंकृत केल्याने पुरेशा रस्त्याअभावी येथील रहिवाशांना मोठी कसरत करावी लागते. तसेच प्रभागामध्ये गटारींची स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेअभावी गटारींमधील साचलेल्या कचऱ्यामध्ये गवत वाढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड इरफान अहमद अ. गनी यांचा मनपाशी मागील दोन ते तीन वर्षांपासून पत्रव्यवहार करीत आहेत, मात्र राजकीय दबावापोटी मनपा प्रशासनाकडून या संदर्भात पत्रांना उत्तरे देण्याखेरीज कुठलीही पावले उचलली गेली नाहीत. यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याने आंदोलकांनी संविधानाच्या मुखपृष्ठाची प्रतीकात्मक मुकुट घालून व गांधीजींच्या वेशभूषेत मनपाच्या कार्यपद्धतीचा निषेध करीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अनोखे आंदोलन केले.
यावेळी मुस्लीम धांडे, अख्तर हुसैन गांधी व इरफान अहमद अब्दुल गनी या तीन आंदोलकांना पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर सायंकाळी सोडून देण्यात आले.
मनपाच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी अख्तर हुसैन गांधी व सहकाऱ्यांनी गांधीजींच्या वेशभूषेत व संविधानाची प्रतिकृती असलेले मुकुट डोक्यावर घेत अभिनव आंदोलन केले. याप्रसंगी गांधीजींच्या वेशभूषेतील अख्तर हुसैनसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे गांधीजींना अटक झाल्याची चांगलीच चर्चा परिसरात होत आहे.