दिव्यांग भवन उद्घाटन अन प्रहार संघटनेचे आंदोलन
By Suyog.joshi | Published: February 12, 2024 07:28 PM2024-02-12T19:28:56+5:302024-02-12T19:29:45+5:30
महापालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी मनपा प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
नाशिक - शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनच्या ई-लोकार्पणावर प्रहार जनशक्ती पक्षाने आक्षेप घेतला आहे. महापालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी मनपा प्रवेशद्वारावर आंदोलन केले. तसेच बच्चू कडू यांना बोलावून दिव्यांग केंद्राचे उद्घाटन करण्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.
जिल्हाप्रमुख शरद शिंदे, दिव्यांग जिल्हाप्रमुख रवींद्र टिळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रहारने निवेदनात म्हटले की, दिव्यांग भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमास बच्चू कडू यांची नियोजित वेळ घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे आवश्यक होते. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपाने कडू यांना नियोजित कार्यक्रमाची माहिती न देता ऐनवेळी शुक्रवारी फोनवर कार्यक्रमाची माहिती दिली. निमंत्रण पत्रिका बनविली. त्या पत्रिकेतील नावामध्ये ही चूक केली. पालिका प्रशासनाने कडू यांची नियोजित वेळ घेऊन पुन्हा कार्यक्रम घ्यावा.
शहरातील दिव्यांग बांधवांना या कार्यक्रमास स्वाभिमानाने बोलवावे. येत्या दहा दिवसांत यावर निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी दिला. यावेळी उत्तर महाराट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, उत्तर महाराष्ट्र दिव्यांगप्रमुख जकब पिल्ले, जिल्हा चिटणीस समाधान बागुल, शहरप्रमुख संतोष माळोदे, तालुकाप्रमुख गोकुळ कासार, आयटीप्रमुख कमलाकर शेलार, शहरप्रमुख श्याम गोसावी, संध्या जाधव, वैशाली अनवट, सीमा पवार, संतोष मानकर, भाऊसाहेब सांगळे, यशवंत सातपुते आदी उपस्थित होते.